‘ऑफलाईन’च्या नव्या ‘इनिंग’मध्ये ‘मॉडेल’ उत्तरपत्रिका नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2022 12:54 PM2022-04-19T12:54:00+5:302022-04-19T12:58:59+5:30
यासंदर्भात परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी ‘मॉडेल’ उत्तरपत्रिकांची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले.
योगेश पांडे
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात दोन वर्षांच्या कालावधीनंतर ‘ऑफलाईन’ परीक्षांचे आयोजन होणार आहे. ‘ऑनलाईन’च्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबतचे दावे-प्रतिदावे बंद झाले होते. मात्र, ‘ऑफलाईन’मध्ये फेरमूल्यांकनासाठी अर्जांचे प्रमाण परत वाढेल. विद्यार्थ्यांमध्ये उत्तरांबाबत असलेला संभ्रम दूर करण्यासाठी विद्यापीठाने ‘मॉडेल’ उत्तरपत्रिका जारी करणे आवश्यक आहे. मात्र, यासंदर्भात विद्यापीठ प्रशासन उदासीन असल्याचे चित्र आहे. २०१३ साली याबाबत पावले उचलण्यात आली होती; परंतु आता हा मुद्दाच थंडबस्त्यात गेला आहे.
‘ऑफलाईन’ परीक्षा होत असताना विद्यापीठात मूल्यांकन व फेरमूल्यांकनाच्या मुद्द्यावरून नेहमीच प्रश्न उपस्थित होत होते. मूल्यांकन करताना प्राध्यापकांना सोयीचे व्हावे व विद्यार्थ्यांच्या मनातील निरनिराळ्या शंकांचे निरसन व्हावे याकरिता २०१३ मध्ये ‘मॉडेल’ उत्तरपत्रिका संकेतस्थळावर ’अपलोड’ करण्याचा प्रयोग सुरू करण्यात आला होता. तत्कालीन परीक्षा नियंत्रक विलास रामटेके यांच्या पुढाकारातून अभियांत्रिकी शाखेच्या ‘मॉडेल’ उत्तरपत्रिका संकेतस्थळावर टाकण्यातदेखील आल्या होत्या. मात्र, त्यानंतर एकाही विद्याशाखेची ‘मॉडेल उत्तरपत्रिका’ विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झालेली नाही. विशेष म्हणजे ज्या ‘मॉडेल’ उत्तरपत्रिका संकेतस्थळावर होत्या, त्याच्या उत्तरांबाबत कोणी आक्षेप घेतले नव्हते.
यासंदर्भात परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी ‘मॉडेल’ उत्तरपत्रिकांची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले. विद्यापीठाने संकेतस्थळावर ‘मॉडेल’ उत्तरपत्रिका टाकाव्यात, असे विद्यापीठ अनुदान आयोगाने अनिवार्य केलेले नाही. त्यामुळे याबाबत सद्य:स्थितीत विचार करण्यात येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
‘मॉडेल’ उत्तरांची आवश्यकता का?
‘मॉडेल’ उत्तरे नसल्याने अभियांत्रिकीसह अनेक विद्याशाखांच्या मूल्यांकनाला फटका बसतो, असे दिसून येते. प्राध्यापकांसमोर ‘मॉडेल’ उत्तरे नसल्याने अनेकदा विद्यार्थ्यांना कमी गुण मिळतात, असा तर्कदेखील लावण्यात येतो. शिवाय
परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर गुण कमी मिळाल्यास उत्तरपत्रिकांच्या तपासणीवर आक्षेप घेतला जातो; परंतु अपेक्षित उत्तरांसह प्रत्येक विषयाची मॉडेल उत्तरपत्रिका तयार करून ती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्यास विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिका पडताळून पाहता येतील. उत्तरपत्रिकांच्या ‘झेरॉक्स’ विद्यार्थ्यांना दिल्या जात असल्याने पालकांनाही त्याची तुलना मॉडेल उत्तरपत्रिकांबरोबर करता येईल.
विद्यार्थी संघटनांचे दुर्लक्ष
काही वर्षांअगोदर विद्यार्थी संघटनांनी ‘मॉडेल’ उत्तरपत्रिकांचा मुद्दा लावून धरला होता. मात्र, त्यानंतर हा मुद्दा मागे पडला. ‘ऑनलाईन’च्या काळात तर त्याची गरज नव्हती. मात्र, आता परत ‘ऑफलाईन’ परीक्षा होत असताना संघटनांना विद्यार्थ्यांशी जुळलेल्या या महत्त्वाच्या बाबीचाच विसर पडल्याचे चित्र आहे.