स्त्री बीज तयार करण्यासाठी आता इंजेक्शन नव्हे गोळ्या
By सुमेध वाघमार | Published: June 5, 2023 06:40 PM2023-06-05T18:40:30+5:302023-06-05T18:40:54+5:30
Nagpur News आयव्हीएफ या तंत्रज्ञानात आता अधिक सुधारणा झाली असून, इंजेक्शनऐवजी गोळ्या उपलब्ध झाल्या असल्याची माहिती भारतीय वंध्यत्व सोसायटीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. के. डी. नायर यांनी दिली.
सुमेध वाघमारे
नागपूर : वंध्यत्त्वाचे प्रमाण वाढत चालले आहे. यावर मात करण्यासाठी ‘इन व्हिट्रो फर्टिलायझेशन’ म्हणजे ‘आयव्हीएफ’ प्रभावी पर्याय आहे. या उपचार पद्धतीमुळे दरवर्षी हजारो जोडप्यांची संसारवेल यशस्वीपणे फुलवली जात आहे. या प्रक्रियेत स्त्रीला इंजेक्शन्स देऊन तिच्या शरीरात स्त्री बीज तयार केली जातात. परंतु, आता इंजेक्शनऐवजी गोळ्या उपलब्ध झाल्या आहेत. या ‘प्रोजेस्टिन - प्राइमड ओव्हेरियन स्टिम्युलेशन’चे (पीपीओएस) अनेक फायदे आहेत, अशी माहिती भारतीय वंध्यत्व सोसायटीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. के. डी. नायर यांनी दिली.
नागपूर ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजी सोसायटीच्यावतीने (एनओजीएस) आयोजित दुसऱ्या वार्षिक परिषदेत ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉ. वनिता जैन, इंडियन फर्टिलिटी सोसायटीचे पुढील वर्षाचे अध्यक्ष डॉ. पंकज तलवार, डॉ. नटचंद्र चिमोटे, डॉ. बिंदू चिमोटे, एनओजीएसच्या अध्यक्ष डॉ. सुषमा देशमुख, सचिव डॉ. प्रगती खळतकर आदी उपस्थित होत्या.
डॉ. नायर म्हणाले, ‘पीपीओएस’ हा एक प्रभावी डिम्बग्रंथी उत्तेजक करणारा ‘प्रोटोकॉल’ आहे. ज्यात सकारात्मक परिणाम दिसून येतात. यात पारंपरिक इंजेक्शनची जागा तोंडवाटे घेणाऱ्या गोळ्यांनी घेतली आहे. इंजेक्शनच्या बदल्यात गोळ्यांचा वापर सुलभ असून, याचे फायदेही दिसून येत आहेत. इंजेक्शनच्या तुलनेत गोळी स्वस्त आहे. या नवीन तंत्रांची प्रभाविता आणि सुरक्षितता सत्यापित करण्यासाठी पुढील संशोधन आणि क्लिनिकल चाचण्या चालू आहेत.