दोनपेक्षा अधिक वेळा स्थगिती नाहीच; ‘महारेरा’ची अधिसूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:10 AM2021-09-22T04:10:47+5:302021-09-22T04:10:47+5:30
नागपूर : ग्राहकांची प्रकरणे लवकरात लवकर निकाली निघावीत, या उद्देशाने महारेराने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली असून दाखल करण्यात ...
नागपूर : ग्राहकांची प्रकरणे लवकरात लवकर निकाली निघावीत, या उद्देशाने महारेराने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली असून दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात दोनपेक्षा अधिक वेळा स्थगिती घेता येणार नाही. त्यामुळे वारंवार स्थगिती मागणाऱ्यांना यापासून धडा मिळाला आहे. प्राधिकरणाच्या या निर्णयाचा लाभ ग्राहकांना होणार आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास अधिकाधिक ग्राहक घर-भूखंड खरेदीदारांच्या तक्रारीचा निपटारा महारेरात होणार आहे. लहानसहान कारणांसाठी स्थगित होणाऱ्या प्रकरणांमुळे खटला लांबत राहत असल्याने अनेकजण न्यायालयाची पायरी चढत नाहीत. यावर महारेराने उपाय शोधत अशी स्थगिती मागणाऱ्यांवर मर्यादा आणली आहे. महारेरामध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणांत दोनपेक्षा अधिक वेळा स्थगिती मागता येणार नाही. मुख्य म्हणजे आजारपणाचे कारण सांगून स्थगिती घेणेदेखील महागात पडणार आहे. आजाराचे कारण तितके गंभीर आणि प्राधिकरणाच्या दृष्टीने समाधानकारक असेल तरच स्थगिती मिळू शकणार आहे. मी तयार नाही, उद्या युक्तिवाद करतो, दुसऱ्या प्रकरणात व्यस्त असल्यामुळे युक्तिवाद करता येणार नाही, अशी कारणे स्थगितीसाठी ग्राह्य धरली जाणार नाहीत, असे महारेराने स्पष्ट केले आहे.
कोरोनाची संभावित तिसरी लाट बघता महारेरातील प्रकरणांची सुनावणी प्रत्यक्ष स्वरूपात न घेता केवळ ऑनलाईन होणार आहे. अत्यावश्यक स्थितीतच प्रत्यक्ष सुनावणी घेण्यात येणार आहे. कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात प्रकरणे रखडलेली आहेत. त्या प्रकरणांचा निपटारा जलदगतीने होण्यासाठी ऑनलाईन सुनावणीवर भर राहणार आहे.