बुबुळासाठी आता दात्याची वाट पाहणयची गरज नाही, कृत्रिम बुबुळाने पहाता येईल जग
By सुमेध वाघमार | Published: August 24, 2023 05:37 PM2023-08-24T17:37:23+5:302023-08-24T17:38:20+5:30
मेडिकलचा नेत्ररोग विभागात नेत्रदान पंधरवडा
नागपूर : भारतात बुबुळच्या दोषामुळे अंध झालेल्या लोकांची संख्या १ लाख २० हजार इतकी आहे. दरवर्षी यात २५ ते ३० हजार नव्या रुग्णांची भर पडते. मरणोत्तर नेत्रदानाने ही संख्या कमी करणे शक्य असलेतरी वर्षाला बुबुळ प्रत्यारोपणाची संख्या केवळी ३० ते ४० हजार आहे. यावर पर्याय म्हणून कृत्रिम बुबुळ प्रत्यारोपणाला सुरुवात झाली आहे. हा प्राथमिक टप्पा असल्याने ते खर्चिक व यशस्वतीचे प्रमाण २५ टक्केच आहे, अशी माहिती मेडिकलच्या नेत्ररोग विभागाचे प्राध्यापक डॉ. अशोक मदान यांनी दिली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) नेत्ररोग विभागाच्यावतीने नेत्रदानाच्या जनजागृतीसाठी २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर हा कालावधी ‘नेत्रदान पंधरवडा’ म्हणून साजरा केला जात आहे. याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी नेत्ररोग विभागाच्या प्रमुख डॉ. मिनल व्यवहारे, डॉ. कविता धाबर्डे व डॉ. निलेश गादेवार उपस्थित होते.
- नैसर्गिक बुबुळ प्रत्यारोपणाचा दर ७५ टक्के
देशात कॉर्निया म्हणजे बुबुळ प्रत्यारोपणासाठी मोठी प्रतीक्षा यादी आहे. बुबुळाच्या दानाने यांच्या जीवनातील प्रकाश परत येऊ शकतो, परंतु मागणीच्या तुलनेत ५० टक्केही बुबुळ दान होत नाही. यामुळे कृत्रिम बुबुळ हा पर्याय पुढे आला आहे. परंतु याला मर्यादा आहेत. कृत्रिम बुबुळाच्या तुलनेत नैसर्गिक बुबुळ प्रत्यारोपण कधीही चांगले असून याचा यशस्वीतेचा दर ७५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे.
- बुबुळच्या दोषामुळे अंधत्व येण्याचे प्रमाण २४ टक्के
डॉ. मदान म्हणाले, भारतात बुबुळच्या दोषामुळे अंधत्व येण्याचे प्रमाण २४ टक्के आहे. यात मोतीबिंदुमुळे ६६.२ टक्के, मोतीबिंदुमधील शस्त्रक्रियेत गुंतागुंत निर्माण झाल्यास ७.२ टक्के, वाढत्या वायामुळे ५.९ टक्के तर काचबिंदुमुळे ५.५ टक्केअंधत्व येण्याचे प्रमाण आहे.