नेटवर्क नाही, तरीही फास्टॅगचे बंधन का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 11:02 AM2019-12-05T11:02:08+5:302019-12-05T11:03:08+5:30
भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने काढलेल्या आदेशानुसार प्रत्येक वाहनाला फास्टॅग लावणे गरजेचे आहे. फास्टॅग न लावल्यास दुप्पट टोल वसूल करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहे. त्यामुळे ते फास्टॅग लावण्यासाठी धडपडत आहे.
धीरज शुक्ला।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने काढलेल्या आदेशानुसार प्रत्येक वाहनाला फास्टॅग लावणे गरजेचे आहे. फास्टॅग न लावल्यास दुप्पट टोल वसूल करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहे. त्यामुळे ते फास्टॅग लावण्यासाठी धडपडत आहे.
दुसरीकडे प्रशासनाने त्यासाठी तयारी केलेली दिसत नाही. प्रत्येक टोल प्लाझावर फास्टॅग काम करीत आहे की नाही, याचे आॅन दी स्पॉट सर्वेक्षण लोकमतने केले. बुधवारी छिंदवाडा मार्गावरील टोल प्लाझाचा आढावा घेण्यात आला. यात लक्षात आले की, टोल प्लाझामध्ये फास्टॅगच्या अंमलबजावणीची तयारीच नव्हती.
सावनेर जवळील टोल प्लाझावर पत्रकाद्वारे जनजागृती
लोकमत प्रतिनिधीने सावनेर जवळील टोल प्लाझाला भेट दिली असता, तेथील कर्मचारी वाहनचालकांना पत्रक वाटत होते. या पत्रकाच्या माध्यमातून फास्टॅग का गरजेचे आहे, हे सांगत होते. या टोल प्लाझावरील कर्मचारी म्हणाले की, फास्टॅगमुळे टोलची रक्कम वसूल करण्यात कुठलीही अडचण येत नाही. कधीकधी नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो. परंतु जास्त त्रास होत नाही.
वाहनांच्या लांबच लांब रांगा
सावनेर जवळील टोल प्लाझावर फास्टॅगची व्यवस्था होती. मात्र येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून आल्या. ज्या वाहनांवर फास्टॅग लावले आहे, त्यांच्यासाठी वेगळी लाईन नव्हती. त्यामुळे ज्या वाहनांवर फास्टॅग लावण्यात आले नव्हते, त्यांच्याकडून टोल वसूल करण्यात वेळ लागत असल्याने फास्टॅग लागलेल्या वाहनांना थांबावे लागत होते.
केळवदमध्ये नेटवर्क नव्हते
लोकमत प्रतिनिधी केळवदला पोहचले. तेथील टोल प्लाझावर फास्टॅग लागलेल्या वाहनांचे निरीक्षण केले. येथे बहुतांश वाहनावर फास्टॅग लागलेले आढळले. मात्र टोल वसूल करणारे कर्मचारी रोख वसूल करताना आढळले. यासंदर्भात विचारणा केली असता, तिथे नेटवर्कच मिळत नव्हते. येथील कर्मचारी म्हणाले की, नेटवर्क नसल्यामुळे आम्ही फास्टॅगपासून टोल वसुली करू शकत नाही. ते म्हणाले की, यासंदर्भात आम्ही वाहनचालकांसाठी सूचनाही लावली आहे.