पीक कर्जासाठी बँकांकडून एनओसीची गरज नाही : उपविभागीय अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 08:18 PM2020-06-03T20:18:19+5:302020-06-03T20:19:46+5:30
शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी कुठल्याही बँकांकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळविण्याची व ते सादर करण्याची आवश्यकता नाही. शेतकऱ्यांचे पीक कर्ज यादीत नाव आहे एवढेच पुरेसे असून बँकांनी शेतकºयांना एनओसी मागू नये, असे उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी यांनी कळविले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी कुठल्याही बँकांकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळविण्याची व ते सादर करण्याची आवश्यकता नाही. शेतकऱ्यांचे पीक कर्ज यादीत नाव आहे एवढेच पुरेसे असून बँकांनी शेतकºयांना एनओसी मागू नये, असे उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी यांनी कळविले आहे.
पीक कर्ज मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी विविध बँकांकडे जात असून, तेथे शेतकऱ्यांना त्यांची जमीन असणाऱ्या कार्यक्षेत्रात जेवढ्या काही बँका असतील त्यांच्याकडून ‘नो ड्यू सर्टिफिकेट’ मागविले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहरकत प्रमाणपत्रासाठी मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास होत आहे. त्याचप्रमाणे सद्यस्थितीत कोव्हिड-१९ साथरोग काळात बँक शाखेसमोर मोठ्या रांगा लागलेल्या असून, त्या ठिकाणी सामाजिक अंतरही पाळले जात नाही. ही बाब अत्यंत गंभीर असून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकान्वये ‘नाहरकत प्रमाणपत्रा’ची गरज नसतानाही असे दाखले सर्व शाखांकडून मागविले जात आहेत.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकान्वये यापुढे शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी कोणत्याही प्रकारे ‘नाहरकत प्रमाणपत्र’ सर्रास मागण्याची कार्यपद्धती बँकेने बंद करावी, याबाबत कळविण्यात आलेले आहे. शेतकरी बांधवांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले पीक कर्ज प्रकरण संबंधित बँक शाखेत जमा करावे. कोणत्याही प्रकारे बँकेने इतर शाखांचे नाहरकत प्रमाणपत्र मागितल्यास ते देऊ नये, याची संबंधित शेतकऱ्यांनी नोंद घेऊन आपले श्रम, वेळ व पैसा याची बचत करावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी यांनी केले आहे.