संख्याबळ नाही पण महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक लढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 11:59 PM2020-12-29T23:59:52+5:302020-12-30T00:56:55+5:30
NMC Mayor election, nagpur news महापालिकेतील संख्याबळ विचारात घेता महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपापुढे आव्हान नाही. परंतु लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी महाविकास आघाडी तसेच बसपा उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेतील संख्याबळ विचारात घेता महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपापुढे आव्हान नाही. परंतु लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी महाविकास आघाडी तसेच बसपा उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहेत.
५ जानेवारीला महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज ३० डिसेंबरला सादर करावयाचा असल्याने
सर्व पक्ष उमेदवारांचे नाव निश्चित करण्यात व्यस्त होते. महाविकास आघाडीतर्फे महापौरपदासाठी काँग्रेसचे नगरसेवक मनोज गावंडे, उपमहापौरपदासाठी शिवसेनेच्या नगरसेविका मंगला गवरे निवडणूक लढणार आहे. बसपातर्फे नरेंद्र वालदे महापौरपदासाठी तर उपमहापौरपदासाठी गटनेता वैशाली नारनवरे यांना उमेदवार करण्यावर चर्चा झाली. उमेदवार न मिळाल्यास नारनवरे यांनी स्वत: निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.
मनपातील १५१ नगरसेवकांपैकी भाजपचे १०८, काँग्रेस २९, बसपा १०, शिवसेना २ व राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष प्रत्येकी एक असे संख्याबळ आहे. याचा विचार करता सर्व विरोधक एकत्र आले तरी भाजपचा पराभव शक्य नाही. परंतु महाविकास आघाडीने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी दिली. यासंदर्भात पक्षश्रेष्ठींना अवगत केले आहे. काँग्रेस महापौर तर शिवसेना उपमहापौर पदासाठी उमेदवार देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आज उमेदवारी, ५ ला निवडणूक
महापौर व उपमहापौरपदासाठी ५ जानेवारीला सुरेश भट सभागृहात सकाळी ११ वाजता निवडणूक होत आहे. विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी यांना पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. बुधवारी ३० डिसेंबरला सकाळी ११ ते दुपारी ३ दरम्यान मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात निगम सचिव यांच्याकडे इच्छूक उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल.