स्वयंरोजगारासाठी चार वर्षांत एकालाही कर्ज वाटप नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:10 AM2021-09-23T04:10:59+5:302021-09-23T04:10:59+5:30
- राज्याच्या मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचा कारभार रियाज अहमद / लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अल्पसंख्याक समुदायातील ...
- राज्याच्या मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचा कारभार
रियाज अहमद / लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अल्पसंख्याक समुदायातील युवक/युवतींना स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करवून देणाऱ्या राज्याच्या मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाने गेल्या चार वर्षांत एकालाही कर्ज वाटप केले नसल्याचे उघड झाले आहे.
मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून अल्पसंख्याक समुदायातील युवा वर्गाला स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करवून देत असते. महामंडळाच्या या थेट कर्ज योजनेतून बेरोजगारांना लहान-मोठ्या व्यवसायासाठी सहज कर्ज मिळत असते; परंतु गेल्या चार वर्षांपासून महामंडळाने एकालाही या कर्ज योजनेचा लाभ दिलेला नाही. या थेट कर्ज योजनेशिवाय अवधी कर्ज योजना आणि सूक्ष्म (बचत गट) कर्ज योजनांची स्थितीही तशीच आहे. कर्ज पुरवठा योजनेचे हे आकडे महामंडळाच्या उदासीन धोरणाचा कारभार उघड पाडतात. या आकडेवारीवरून विद्यमान महाविकास आघाडीचे सरकार असो वा यापूर्वीचे सरकार, कुणालाच अल्पसंख्याकांच्या विकासाचे महत्त्व नसल्याचे स्पष्ट होते.
वर्ष २०१४-१५मध्ये महामंडळाने थेट कर्ज योजनेतून ११,०३६ लाभार्थींना ४४ कोटी १४ लाख ४० हजार रुपये वितरित केले होते. वर्ष २०१५-१६च्या आर्थिक वर्षात २,८३७ लाभार्थींना ११ कोटी ३४ लाख ४० हजार रुपये, तर २०१६-१७ मध्ये केवळ ४२ लाभार्थींना १८ लाख ९७ हजार रुपये कर्ज वाटप केले होते; परंतु २०१७-१८ पासून ते २०२०-२०२१ पर्यंत एकाही लाभार्थीला कर्ज दिलेले नाही. सूक्ष्म बचत गट योजनेमध्ये तर गेल्या पाच वर्षांपासून एक रुपयाही वाटण्यात आलेला नाही. महामंडळाने वर्ष २०१६-१७ ते २०२१ पर्यंत एकाही बचत समूहाला कर्ज दिलेले नाही. यासोबतच अवधी कर्ज योजनेची स्थिती तर आणखीनच कठीण झालेली आहे. गेल्या सात वर्षांत महामंडळाने अवधी योजनेत केवळ ३ कोटी ८३ लाख ४ हजार रुपये वितरित केले आहेत. त्यात केवळ ४४१ लाभार्थींनाच लाभ मिळाला. या योजनेंतर्गत यावर्षी एकालाही कर्ज मिळाले नाही. आश्चर्याची बाब म्हणजे, अल्पसंख्याकांचे कैवारी म्हणवणारे नेते सुद्धा महामंडळाच्या या स्थितीवर मूकदर्शक बनून आहेत.
-------------
थेट कर्ज योजना
वर्ष - लाभार्थी - निधी वितरण
२०१४-१५ - ११,०३६ - ४४ कोटी १४ लाख ४० हजार रुपये
२०१५-१६ - २,८३७ - ११ कोटी ३४ लाख ४० हजार रुपये
२०१६-१७ - ४२ - १८ लाख ९७ हजार रुपये
२०१७-१८ - ०० - ००
२०१८-१९ - ०० - ००
२०१९-२० - ०० - ००
२०२०-२१ - ०० - ००
----------
सूक्ष्म (बचत गट) कर्ज योजना
वर्ष - लाभार्थी गट - निधी वितरण
२०१४-१५ - २६५ - ५ कोटी ६ लाख रुपये
२०१५-१६ - १५४ - २ कोटी ९५ लाख १० हजार रुपये
२०१६-१७ - ०० - ००
२०१७-१८ - ०० - ००
२०१८-१९ - ०० - ००
२०१९-२० - ०० - ००
२०२०-२१ - ०० - ००
------------
अवधी कर्ज योजना
वर्ष - लाभार्थी - निधी वितरण
२०१४-१५ - ०० - ००
२०१५-१६ - ३६७ - ३ कोटी ४७ लाख ४ हजार रुपये
२०१६-१७ - ३७ - ३५ लाख ५ हजार रुपये
२०१७-१८ - ०१ - ९५ हजार रुपये
२०१८-१९ - ०० - ००
२०१९-२० - ३६ - ३३ लाख ५३ हजार रुपये
२०२०-२१ - ०० - ००
...............