नागपुरात सरकारी कार्यालयात बुधवारीही शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 08:26 PM2019-10-30T20:26:52+5:302019-10-30T20:30:28+5:30
शासकीय कर्मचाऱ्यांची दिवाळीच्या सुट्यांची झिंंग अजूनही उतरलेली नाही. शनिवारपासून बंद असलेली शासकीय कार्यालये बुधवारी उघडली. मात्र कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या निम्म्यापेक्षाही कमी आढळून आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय कर्मचाऱ्यांची दिवाळीच्या सुट्यांची झिंंग अजूनही उतरलेली नाही. शनिवारपासून बंद असलेली शासकीय कार्यालये बुधवारी उघडली. मात्र कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या निम्म्यापेक्षाही कमी आढळून आली. कर्मचाऱ्यांबरोबरच अधिकाऱ्यांनीही कामकाजाच्या पहिल्या दिवशी बुट्टी मारली होती.
सिव्हील लाईन्सच्या प्रशासकीय परिसरात बुधवार रोजी रविवारसारखे वातावरण अनुभवायला मिळाले. परिसरात असलेले विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हा परिषद यासह प्रशासकीय इमारत क्रमांक १ व २ मध्ये शासनाच्या विविध विभागाचे कार्यालय आहे. त्यामुळे या प्रशासकीय परिसरात कार्यालयीन वेळेत कामकाजासाठी येणाऱ्या-जाणाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची सातत्याने वर्दळ असते. बुधवारी मात्र परिसरात बऱ्यापैकी शुकशुकाट जाणवला. दिवाळीचे लक्ष्मीपूजन रविवारी होते. शासकीय कर्मचाऱ्यांची ही सुटी गेली. मात्र महिन्याचा चौथा शनिवार असल्याने, शनिवारपासूनच शासकीय कार्यालय बंद होती. बुधवारी कामकाजाचा पहिला दिवस होता. पण मोठ्या संख्येने कर्मचारी बुधवारी सुटीवर होते. परिसरातील जिल्हा परिषद, विभागीय आयुक्त कार्यालय, प्रशासकीय इमारतींमधील कार्यालयाचा आढावा घेतला असता, ६० ते ७० टक्के कर्मचारी सुटीवर आढळून आले. कर्मचाऱ्यांबरोबरच काही विभागाचे प्रमुखही बुधवारी सुटीवर होते.
जे कर्मचारी बुधवारी कार्यालयात आले त्यांची कार्यालयातील वातावरण बघून कामकाज करण्याची मनस्थिती झाली नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचीही कार्यालयात सारखी उठबस सुरू होती. परंतु शासकीय कार्यालयात असलेल्या शुकशुकाटीचा फटका कामकाजासाठी येणाऱ्या अभ्यागतांना बसला. बुधवारी कार्यालयांमध्ये सुटीचे वातावरण असल्याने त्यांना परतीचा मार्ग धरावा लागला. विशेष म्हणजे बहुतांश कार्यालयातील शिपाई मात्र कामावर दिसून आले.