कुणाचा मोबाईल, कुणाचे घड्याळ परत घ्यायला कुणी येईना; काही २०, तर काही ४० वर्षांपूर्वीचे

By नरेश डोंगरे | Published: November 3, 2023 09:10 PM2023-11-03T21:10:40+5:302023-11-03T21:10:49+5:30

मिळेल त्या किंमतीत विल्हेवाट लावण्याचा निर्णय

No one will come to take back mobile, watch, bag | कुणाचा मोबाईल, कुणाचे घड्याळ परत घ्यायला कुणी येईना; काही २०, तर काही ४० वर्षांपूर्वीचे

कुणाचा मोबाईल, कुणाचे घड्याळ परत घ्यायला कुणी येईना; काही २०, तर काही ४० वर्षांपूर्वीचे

नागपूर : पोलिसांच्या मालखान्यात ४० वर्षांपासून कुणाची पर्स आणि कुणाची बॅग आहे. कुणाचे हातघड्याळ तर कुणाचा मोबाईल आहे. ज्यांचा कुणाचा असेल त्यांनी तो घेऊन जावा, असे पोलिसांनी वारंवार आवाहन केले. मात्र, त्याला कसलाच प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आता पोलिसांनी या सर्व बेवारस वस्तूंची मिळेल त्या किंमतीत विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला आहे.

कुठे कोणती बेवारस चिजवस्तू, साहित्य सापडले किंवा कुणी पोलीस ठाण्यात आणून दिले तर पोलीस अशा चिजवस्तूंचा जप्ती पंचनामा करून त्या वस्तू मालखान्यात जमा करतात. चोरीच्या गुन्ह्यातील कुणी आरोपी पकडले गेले आणि त्यांच्याकडून संबंधित गुन्ह्याच्या व्यतिरिक्त आणखी काही माल अथवा चिजवस्तू जप्त करण्यात आल्या तर त्यासुद्धा मालखान्यात ठेवल्या जातात. तशा वस्तू बेवारस अवस्थेत वर्षानुवर्षे पोलीस ठाण्याच्या मालखान्यात पडून असतात.

त्या कुणाच्या आहेत, कुणाच्या नाही ते माहित नसल्याने पोलीस वारंवार नोटीस काढून संबंधितांना ओखळ पटवून त्या चिजवस्तू घेऊन जाण्याचे आवाहन करतात. मात्र, संबंधितांना त्याची माहितीच मिळत नाही आणि त्यामुळे या वस्तू वर्षानुवर्षे पोलीस ठाण्याच्या मालखान्यात धूळ खात पडून राहतात. येथील रेल्वे पोलीस ठाण्यातील माखान्यातही १९८२ पासून जप्त करण्यात आलेल्या अनेक चिजवस्तू, साहित्य धूळखात पडून आहे. त्यात पर्स, सुटकेस, बॅग, कपडे, छोट्या-छोट्या अनेक वस्तू, ८ ते १० हातघड्याळांचा समावेश आहे. दुसरे म्हणजे, गेल्या २० वर्षांतील विविध कंपन्यांचे ३३ मोबाईलही आहेत. ज्याचे असेल त्याने ते घेऊन जावे, असे रेल्वे पोलिसांनी त्या संबंधाने यापूर्वी वारंवार आवाहन केले. मात्र, हे आवाहन संबंधित व्यक्तींपर्यंत पोहचले नसल्याने त्याला प्रतिसादच मिळाला नाही. पोलीस ठाण्यात येऊन कुणी त्या चिजवस्तू नेण्याची तसदी घेतली नाही.

आता होणार लिलाव
विनाकारण मालखान्याची जागा व्यापून असलेल्या या चिजवस्तू कुणी नेणार नाही, याची खात्री पटल्यामुळे रेल्वे पोलिसांनी कायदेशिर बाबींची प्रक्रिया पूर्ण करून मिळेल त्या किंमतीत ते सर्व विकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, रेल्वेस्थानकावर असलेल्या रेल्वे पोलीस ठाण्यात या सर्व चिजवस्तूंचा ७ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता लिलाव केला जाणार आहे. विशेष म्हणजे, या वस्तू फारच जुन्या आहेत. त्यामुळे त्यांच्या लिलावाला कसा प्रतिसाद मिळणार, असा प्रश्न आहे.

Web Title: No one will come to take back mobile, watch, bag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.