नको ऑनलाईन ‘लेसन’, पोटासाठी हवे ‘रेशन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 08:22 PM2020-06-01T20:22:35+5:302020-06-01T20:24:41+5:30
शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांकरिता सुरू करण्यात आलेल्या ‘लर्न फ्रॉम होम’ उपक्रमाबाबत ग्रामीण भागातील पालकांकडून संताप व्यक्त होत असून ‘ऑनलाईन लेसन नको तर पोटासाठी रेशन द्या’ अशी मागणी ग्रामीण भागातील पालकांकडून होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांकरिता सुरू करण्यात आलेल्या ‘लर्न फ्रॉम होम’ उपक्रमाबाबत ग्रामीण भागातील पालकांकडून संताप व्यक्त होत असून ‘ऑनलाईन लेसन नको तर पोटासाठी रेशन द्या’ अशी मागणी ग्रामीण भागातील पालकांकडून होत आहे.
कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे संपूर्ण जीवनमान विस्कळीत झाले आहे. लोकांचा रोजगार बंद आहे. त्यामुळे खरं तर लोकांची कुटुंबाच्या उदरनिवार्हासाठी धडपड सुरू आहे. लॉकडाऊनमुळे कुठलेही अर्थार्जन नाही. घरातील धान्य संपले आहे. रेशनच्या दुकानात अथवा सेवाभावी संस्थांकडून वितरित करण्यात येत असलेल्या धान्यासाठी रांगा लावाव्या लागत आहेत. एकूणच काय तर लोकांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. ग्रामीण भागातील जीवनाचे असे विदारक चित्र असताना दुसरीकडे मात्र शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांसाठी ‘लर्न फ्रॉम होम’ उपक्रमाचा अट्टाहास सुरू आहे. विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यास देणे, त्यावर आधारित प्रश्नपत्रिका सोडवून घेणे आदी बाबी करून घेतल्या जात आहे. हे सर्व कमी की काय म्हणून रेडिओवरचे कार्यक्रम ऐकण्याबाबतही विद्यार्थ्यांना सक्ती केल्या जात आहे. सुरूवातीला या उपक्रमाबाबत आढावा घेतल्या जात नव्हता परंतु आता त्याबाबतचा आढावा घेणे सुरू झाल्याने शिक्षकही पालकांना वारंवार फोन करून विद्यार्थ्यांबाबत माहिती जाणून घेत आहेत. त्यामुळे ग्रामीण पालक अधिकच त्रस्त होत असून गुरुजी, आम्हाला जगू द्या, सध्या आमच्यासाठी तेच महत्त्वाचे आहे. आज जगलो तर उद्या शिकता येईल. आणि आमच्या लेकरांचा एवढाच कळवळा असेल तर या तुमच्या ऑनलाईन लेसनऐवजी त्याच्यासाठी थोडे रेशन पाठवायला सांगा तुमच्या सरकारला, असा संताप व्यक्त करीत आहेत. एकूणच ग्रामीण भागात राबविण्यात येत असलेल्या ‘लर्न फ्रॉम होम’ उपक्रमाबाबत ग्रामीण पालकांमध्ये प्रचंड चीड आहे. त्याबाबतचा संताप ते शिक्षकांकडे व्यक्त करीत आहेत. काही ठिकाणी यावरून शिक्षक व पालकात वाक्युद्ध रंगल्याचेही उदाहरणं पाहायला मिळत आहेत. हे थांबले नाही तर या उपक्रमावरून शिक्षक व पालकात संघर्ष निर्माण होण्याची संभावना नाकारता येत नाही.
या उपक्रमाची सक्ती करू नये
लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद आहे. लोकांचा रोजगार हिरावल्या गेला आहे. हाताला काम नाही. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न लोकांपुढे आहे. खऱ्या अर्थाने लोकांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. असे असताना लर्न फ्रॉम होम सारखे उपक्रम लादणे योग्य नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या उपक्रमाची सक्ती करण्यात येऊ नये, अशी भावना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे यांनी व्यक्त केली.