पदवी प्रवेशासाठी ‘ऑनलाईन’ नोंदणीची अट नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 11:46 PM2020-07-22T23:46:00+5:302020-07-22T23:49:03+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदवीच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पदवी प्रवेशासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला विद्यापीठ संकेतस्थळावर ‘ऑनलाईन’ नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदवीच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पदवी प्रवेशासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला विद्यापीठ संकेतस्थळावर ‘ऑनलाईन’ नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातील असून, गरीब विद्यार्थ्यांना ‘ऑनलाईन’ सुविधादेखील उपलब्ध नाहीत. अशास्थितीत ‘ऑनलाईन’ नोंदणीची अट रद्द करण्यात यावी, अशी मागणी विद्यापीठ वर्तुळासह विधिसभा सदस्यांकडूनदेखील करण्यात येत आहे. यासंदर्भात विधिसभेचे सदस्य अॅड. मनमोहन बाजपेयी यांनी यासंदर्भात प्रभारी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांना पत्रदेखील पाठविले आहे.
सद्यस्थितीत ‘कोरोना’मुळे अनेकांसमोर आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. पदवीला प्रवेश घेऊ इच्छिणारे अनेक विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहेत. अशास्थितीत त्यांना ‘इंटरनेट कॅफे’ची सुविधा उपलब्ध असेलच की नाही, हे सांगता येत नाही. भौगोलिक स्थिती लक्षात घेता अनेकांसाठी तर ‘ऑनलाईन’ अर्ज भरायला जाणे ही देखील एक परीक्षाच ठरणार आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू शकतात. या अटीचा त्यांना कुठलाही फायदा होणार नाही.
महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना ‘ऑनलाईन’ अर्ज भरण्यासाठी सहकार्य करावे, असे विद्यापीठाने सांगितले आहे. परंतु अनेक महाविद्यालयातदेखील ‘नेट कनेक्टिव्हिटी’ अतिशय संथ आहे. मग ते विद्यार्थ्यांना कसे मदत करू शकणार, असा प्रश्न अॅड. मनमोहन बाजपेयी यांनी उपस्थित केला आहे. काही विधिसभा सदस्यांनीदेखील विद्यापीठाच्या ‘आॅनलाईन’ भूमिकेला विरोध करत ‘ऑफलाईन’ नोंदणीचीदेखील संधी देण्याची मागणी केली आहे.
बाहेरील विद्यार्थ्यांचे काय?
बारावीनंतर अनेक विद्यार्थ्यांना नागपूर किंवा इतर जिल्ह्यातील महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल. मात्र दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी वाहतुकीचे साधन उपलब्ध नाही. अशास्थितीत विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयात जाऊन कागदपत्रे देऊन प्रवेश कसा घ्यायचा, हा मोठा प्रश्न आहे. शिवाय महाविद्यालयात गर्दी झाल्यानंतर ‘कोरोना’चा प्रकोप होण्याचा धोका आहे. अशास्थितीत कुलगुरू याची जबाबदारी घेणार का, असा प्रश्न पत्रकारिता अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष सुनील मिश्रा यांनी उपस्थित केला आहे.