दोन महिन्यापासून वेतन नाही : नागपूर मनपा कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 10:12 PM2018-10-24T22:12:09+5:302018-10-24T22:13:08+5:30
महापालिकेत मागील काही वर्षांत कर्मचारी भरती करण्यात आलेली नाही. परिणामी जवळपास चार हजार पदे रिक्त आहेत. कार्यालयीन कामकाजासाठी कंत्राटी क र्मचाऱ्यांना ठेवण्यात आले आहे. परंतु महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने गेल्या दोन महिन्यापासून त्यांना वेतन मिळालेले नाही. दिवाळीच्या महिन्यातही वेतन मिळण्याची शाश्वती नसल्याने, या कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेत मागील काही वर्षांत कर्मचारी भरती करण्यात आलेली नाही. परिणामी जवळपास चार हजार पदे रिक्त आहेत. कार्यालयीन कामकाजासाठी कंत्राटी क र्मचाऱ्यांना ठेवण्यात आले आहे. परंतु महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने गेल्या दोन महिन्यापासून त्यांना वेतन मिळालेले नाही. दिवाळीच्या महिन्यातही वेतन मिळण्याची शाश्वती नसल्याने, या कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे.
महापालिकेत सुरक्षा रक्षक, संगणक आॅपरेटर, पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे चालक, बस कंडक्टर यांच्यासह विविध विभागात कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना कंत्राटदारांनी कामावर ठेवलेले आहे. आर्थिक कंत्राटदारांचे तंगीमुळे बिल थकल्याने त्यांनी कर्मचाऱ्यांना गेल्या काही महिन्यात वेतन दिलेले नाही. यामुळे कंत्राटी कर्मचारी आर्थिक अडचणीत आहेत. त्यांना दिवाळीपूर्वी वेतन न मिळाल्यास त्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे.
कर्मचारी संघटनेचा संपाचा इशारा
महापालिका कर्मचारी, सफाई कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी व ऐवजदार सफाई कामगारांच्या आर्थिक व अन्य ज्वलंत मागण्यांसाठी राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज असोसिएशनच्या माध्यमातून वेळोवेळी आंदोलने करण्यात आली. परंतु आजवर आश्वासनाशिवाय काही मिळालेले नाही. न्याय्य मागण्यांसाठी संप पुकारण्याची तयारी संघटनेने सुरू केली आहे. संपाबाबत कर्मचाऱ्यांची सहमती घेतली जात आहे. याला ३,७१७ कर्मचाऱ्यांनी लेखी सहमती दर्शविलेली आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती बिघडण्याला कर्मचारी जबाबदार नाहीत. आजवर जेव्हा जेव्हा कर्मचारी आंदोलन करतात तेव्हा तेव्हा त्यांना आर्थिक कारण सांगितले जाते. असे किती दिवस चालणार, असा सवाल कर्मचारी संघटनेने केला आहे.
संपात ऐवजदारही सहभागी होणार
महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या संभाव्य संपात सहभागी होण्यास मोठ्या संख्येने सफाई कर्मचाऱ्यांनी इच्छा दर्शविली आहे. झोनस्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण होत आहे. अपमानास्पद वागणूक दिली जाते. यामुळे ऐवजदारांत प्रचंड असंतोष आहे. त्यांनी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी होण्याला सहमती दर्शविली आहे.
ऐवजदारांचा शुक्रवारी मोर्चा
महापालिकेतील ऐवजदार सफाई कामगार व अन्य कंत्राटी कामगार शुक्रवारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून न्याय मिळत नसल्याने हा मोर्चा काढला जाणार आहे, अशी माहिती नागपूर महानगरपालिका ऐवजदार कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.