हायकोर्टात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन नाही ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:25 AM2020-12-15T04:25:36+5:302020-12-15T04:25:36+5:30
नागपूर : न्यायालयांमध्ये कोरोना हातपाय पसरत असतानाही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अनेक वकील व पक्षकारांद्वारे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन ...
नागपूर : न्यायालयांमध्ये कोरोना हातपाय पसरत असतानाही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अनेक वकील व पक्षकारांद्वारे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. त्यामुळे कोरोना कसा दूर राहील, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
उच्च न्यायालयात १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष उपस्थितीत कामकाजाला सुरुवात झाली. त्यानुसार रोज सकाळी १०.३० ते दुपारी १ व दुपारी २ ते ४ अशा दोन सत्रामध्ये न्यायालयीन कामकाज होत आहे. यासंदर्भात जारी आदेशामध्ये न्यायालयीन कर्मचारी, वकील, पक्षकार आदींनी फिजिकल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करावे आणि न्यायालयात कोणत्याही कामासाठी गर्दी केली जाऊ नये असे स्पष्ट करण्यात आले होते. परंतु, फार कमी वकील व पक्षकार या आदेशानुसार वागत आहेत. इतर सर्वजण घोळक्याने उभे राहतात. खुर्च्यांवर एकमेकांना खेटून बसतात. अनेकजण मास्कही घालत नाहीत. ही कृती कोरोनाला निमंत्रण देणारी ठरत आहे. सध्या कोरोनाचा धोका टळला नसल्यामुळे प्रत्येकाने नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
------------
चौकशी केली जाईल
हायकोर्टात फिजिकल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करणे यासह इतर सर्व नियमांची हायकोर्ट बार असोसिएशनला माहिती देण्यात आली आहे. असे असताना नियमांचे उल्लंघन होत असल्यास त्याची चौकशी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल.
----- अंजू शेंडे, प्रशासकीय व्यवस्थापक, हायकोर्ट.
--------------
पुन्हा आवाहन करू
हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए) नागपूरने कोरोनासंदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. यासंदर्भात पुन्हा एकदा आवाहन केले जाईल. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागणे गरजेचे आहे.
----- ॲड. प्रफुल्ल खुबाळकर, सचिव, एचसीबीए.