सोशल मीडियावर वाघाचे छायाचित्र नको!
By admin | Published: June 18, 2017 02:13 AM2017-06-18T02:13:23+5:302017-06-18T02:13:23+5:30
अलीकडे जंगलात व्याघ्रदर्शन होताच, त्याचे छायाचित्र दुसऱ्याच क्षणी सोशल मीडियावर अपलोड होते.
एनटीसीएचा आक्षेप : वन विभागाला लेखी सूचना
संजय रानडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अलीकडे जंगलात व्याघ्रदर्शन होताच, त्याचे छायाचित्र दुसऱ्याच क्षणी सोशल मीडियावर अपलोड होते. यातून त्या वाघाचे स्थळ (लोकेशन) माहीत होते. हा त्या वाघासाठी फार मोठा धोका आहे, असे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) स्पष्ट करू न, सोशल मीडियावर येणाऱ्या वाघांच्या छायाचित्रांवर आक्षेप घेतला आहे.
यासंबंधी एनटीसीएचे सहा. महानिरीक्षक डॉ. वैभव माथूर यांनी अलीकडेच १७ जून रोजी सर्व राज्यांच्या मुख्य वन्यजीव रक्षकांना पत्र जारी केले आहे. यात त्यांनी फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या वाघांच्या छायाचित्रांवर तीव्र आक्षेप नोंदविला आहे. त्यांच्या मते, एनटीसीएकडे अशा वाघांच्या छायाचित्रांविषयी माहिती प्राप्त झाली आहे. त्यामध्ये अनेक छायाचित्र कॅमेरा ट्रॅपचे सुद्धा आहेत. त्या छायाचित्रातून वाघाच्या अधिवासाची (ठिकाण) माहिती सार्वजनिक होते. शिवाय ती माहिती शिकाऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकते. यातून वनगुन्हे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. माहिती सूत्रानुसार नुकत्याच संपलेल्या उन्हाळ्यात विविध राष्ट्रीय उद्याने आणि व्याघ्र प्रकल्पातील वाघांची शेकडो छायाचित्रे सोशल मीडियावर आली आहेत. यात अनेकदा स्वत: गाईड आणि जिप्सी ड्रायव्हरनी व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर अशी छायाचित्रे टाकली आहेत. तसेच अनेक ग्रुपवर सुद्धा वाघाच्या छायाचित्रांसह तो दिसून आलेल्या ठिकाणांची माहिती दिली जाते. एवढेच नव्हे, तर अनेकदा स्वत: वनरक्षक आणि वन परिक्षेत्र अधिकारी सुद्धा त्यांच्या वन परिक्षेत्रात दिसलेल्या वाघाचे छायाचित्र इंटरनेटवर सार्वजनिक करतात. वास्तविक कॅमेरा ट्रॅपमधील छायाचित्र केवळ कार्यालयीन उपयोगासाठी असतात. मात्र असे असताना काही अतिउत्साही कर्मचारी आणि अधिकारी ते फोटो सार्वजनिक करतात.
यामुळे वन विभागाने आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करू न, कॅमेरा ट्रॅपमधील वाघाचे छायाचित्र सोशल मीडियावर टाकू नये, याविषयी सूचना करण्याची गरज आहे. एनटीसीएने आपल्या या पत्रातून यासंबंधी महत्त्वपूर्ण सूचनाही दिल्या आहेत.