नदीकाठावरील ५ हजार घरे कधीही येऊ शकतात धोक्यात; 'या' भागातील वस्त्या धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2022 02:10 PM2022-06-27T14:10:14+5:302022-06-27T17:26:50+5:30
नागपूर शहरातून वाहणाऱ्या नदीच्या काठावरील कोणतीही जागा चिन्हांकित केली नाही. यामुळे वस्ती वाढत जाऊन आता नदीकाठावरील ५ हजारावर घरे धोक्यात आली आहेत.
नागपूर : शहरातून वाहणाऱ्या नद्यांना पावसाळ्यात पूर आल्याने काठावरील वस्त्यांना धोका होतो. त्यासाठी धोक्याची जागा चिन्हांकित केली जाते. त्यावर कोणतेही बांधकाम करता येत नाही. परंतु सिंचन विभागाने नागपूर शहरातून वाहणाऱ्या नदीच्या काठावरील कोणतीही जागा चिन्हांकित केली नाही. यामुळे वस्ती वाढत जाऊन आता नदीकाठावरील ५ हजारावर घरे धोक्यात आली आहेत.
शहरात नागनदी, पिवळी व पोहरा नदी जाते. या नद्याच्या काठावर ५ हजारावर घरे आहेत. त्यात हजारोंच्या संख्येने कुटुंब राहत असून त्यांचा जीव धोक्यात आहे. मनपाने नदी काठावरील धोक्याची जागा चिन्हांकित करण्यासाठी सिंचन विभागाला प्रस्ताव पाठविला आहे.
नदीच्या पात्राजवळील जवळपास ५०० मीटर अंतरावर कुठलेही बांधकाम नको, असा नियम आहे. देशातील अनेक शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या नद्यांना पुराचा धोक्याची मार्किंग ब्रिटिश शासन काळापासून केली जाते. परंतु नागपुरातून वाहणाऱ्या नागनदी, पोहरा नदी, पिवळी नदीच्या पुराच्या धोक्याो मार्किंगच करण्यात आलेले नाही. १३ ऑगस्ट २०१५ रोजी झालेल्यापावसाने नागपुरात अनेक घरे पाण्याखाली आली होती. पुराचे पाणी जवळपास ४०० घरात शिरले होते. मनपाच्या प्रादेशिक आपात्कालीन सेल आणि मनपाच्या अग्निशमन विभागाने केलेल्या पाहणीत शहराच्या १२१ भागांमध्ये 'अतिधोकादायक' अशी नोंद असून यात ३८५३ घरांचा समावेश आहे.
धोकादायक वस्त्या
महापालिकेच्या दोन्ही सेलतर्फे करण्यात आलेल्या पाहणीत रामदासपेठ, काचीपुरा झोपडपट्टी, धरमपेठ कॉलेजमागील भाग, तेलंगखेडी तलावामागील भाग, धरमपेठेतील गवळीपुरा, काटोल रोडवरील शीलानगर, पांढराबोडी, हजारी पहाड, गांधीनगर झोपडपट्टी, इमामवाड्यातील सिरसपेठ, जुनी शुक्रवारी, तुळशीबाग, नंदनवन ले-आऊट, भुतेश्वरनगर, शिवाजीनगर, पडोळेनगर, आदर्शनगर, संजयनगर, कुंभारटोली, ताजनगर, वांजरा, नारी, झिंगाबाई टाकळी आणि सक्करदरा तलावामागील भागाचा आदी धोकादायक वस्त्यांचा समावेश आहे.
नदीची सुरक्षा महत्वाची
पुराच्या धोक्याचे मार्किंग नदी काठावर वसलेली घरे आणि नदीच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे. नदीवर अतिक्रमण करून घरे बनविल्याने पाण्याच्या प्रवाहास अडथळा निर्माण होतो. तसेच जैवविविधतेचे नुकसान होते. जागा चिन्हाकिंत केल्याने बांधकामे रोखता येऊ शकतात. परंतु, याकडे सिंचन विभागाचे दुर्लक्ष आहे.