'कापसाला भाव नाही, नुकसानीच्या झळा; सोसणारा शेतकरी आत्महत्या करतोय'
By जितेंद्र ढवळे | Published: October 23, 2023 04:13 PM2023-10-23T16:13:06+5:302023-10-23T16:13:22+5:30
यवतमाळमध्ये ४६० शेतकऱ्यांच्या आत्महत्या : अनिल देशमुख यांची सरकारवर टीका
नागपूर : सरकार पक्ष फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त आहे. आधी दुष्काळ नंतर अतिवृष्टीने संकटात सापडलेला शेतकरी कर्जाच्या ओझ्याने आत्महत्या करतोय. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कापसाला भाव मिळत नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते आ. अनिल देशमुख यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केली.
देशमुख म्हणाले, केंद्र सरकारच्या चुकीच्या आयात-निर्यात धोरणामुळे कापसाचे भाव पडले. आघाडी सरकार असताना कापसाला १२ हजार रुपये भाव मिळाला. आता कापसाला ७ हजारही भाव मिळत नाही. अशात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणार नाही. दुसरीकडे विविध रोगांमुळे सोयाबीनचे उत्पादन घटले आहे. मात्र, बाजारात सोयाबीनला योग्य भाव मिळत नाही. शासन मदत जाहीर करते; पण, ती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नाही. यामुळे कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करताहेत. यवतमाळ जिल्ह्यात २०२२ मध्ये २७२ तर सप्टेंबर-२०२३ पर्यंत १८८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सरकार शेतकरी आत्महत्येवर गप्प का, असा सवाल देशमुख यांनी याप्रसंगी केला.
देशात भाव नसताना कापसावर जे ११ टक्के आयात शुल्क होते ते माफ करून जवळपास १६ लाख गाठी विदेशातून आयात का करण्यात आल्या, असा सवालही त्यांनी केला. याप्रसंगी राष्ट्रवादीच्या यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रा.वर्षा निकम, प्रदेश उपाध्यक्ष अफझल फारूक, जि.प.सदस्य सलील देशमुख उपस्थित होते.
सरकारची मदत कागदावरच
राज्यात पावसाने दांडी मारल्याने व नंतर अतिवृष्टी व विविध रोगांच्या प्रादुर्भावाने कापूस व सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी १ हजार ७१ कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू, असे आश्वासन देण्यात आले. परंतु, अद्यापही ती मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही.