देहव्यापार नको, कोणताही चांगला व्यवसाय करा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:11 AM2021-09-04T04:11:29+5:302021-09-04T04:11:29+5:30
नागपूर : गंगा-जमुना वस्तीत देहव्यापार सोडून कोणताही चांगला व्यवसाय करता येऊ शकतो. पोलीस कुणालाही वस्तीतून बाहेर काढू इच्छित नाही. ...
नागपूर : गंगा-जमुना वस्तीत देहव्यापार सोडून कोणताही चांगला व्यवसाय करता येऊ शकतो. पोलीस कुणालाही वस्तीतून बाहेर काढू इच्छित नाही. परंतु देहव्यापाराचे अड्डे कोणत्याही परिस्थितीत चालू देणार नाही. पोलीस कायद्याचे पालन करीत आहेत. जर कुणी कायदा हातात घेत असेल तर पोलीस त्याचा बंदोबस्त करण्यासाठी सक्षम आहेत, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले.
पोलीस आयुक्त पदाचा एक वर्षाचा कार्यकाळ ४ सप्टेंबरला पूर्ण होणार असल्यामुळे शुक्रवारी सायंकाळी पोलीस आयुक्तांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, कुणालाही बेरोजगार करून किंवा संपत्तीतून हटविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. देहव्यापाराशी निगडित महिला गंगा-जमुनातच कामधंदा करू शकतात. तेथील घरमालक स्वत: तेथे राहून संपत्तीचा योग्य वापर करू शकतात. जर घरमालक तेथे राहत असल्यास बिल्डर संपत्ती कशी खरेदी करतील. परिसरातील महिलांना काही त्रास असल्यास त्या पोलिसांकडे तक्रार करू शकणार आहेत. पोलीस अवैध बांधकामही तोडणार नाही. शहरात अनेक ठिकाणी अवैध बांधकामे आहेत. अशा स्थितीत केवळ गंगा-जमुनावर बुलडोझर चालविणे योग्य नाही. पोलिसांच्या मोहिमेला विरोध करण्यात आल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, आम्ही कुणाला उत्तर देण्यासाठी बाध्य नाही. आम्ही कायद्याचे पालन करीत आहोत. पोलिसांनी आतापर्यंत पिटाअंतर्गत सात घरे वर्षभरासाठी सील केली आहेत. आगामी दिवसात आणखी काही अड्डे सील करण्यात येतील. नागरिकांकडून देहव्यापार न करण्याचे लेखी आश्वासन घेण्यात आले आहे. ते त्यावर कायम राहिल्यास घर सील करण्याचा आदेश रद्द केला जाऊ शकतो. वर्षभराच्या काळात ४० गुन्हेगार एमपीडीए तसेच १५० जणांना तडीपार करण्यात आले. गुन्हेगारी थांबविण्यासाठी प्रभावीपणे गस्त आणि अवैध धंद्यांवर तसेच गुन्हेगारांच्या टोळ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. सध्या कोणतीच मोठी टोळी सक्रिय नाही. काही दिवसापूर्वी हल्ल्याच्या घटना वाढल्या होत्या. त्यात नंदनवन, जरीपटका, कपिलनगर, कळमना आणि यशोधरानगर ठाण्यांतर्गत अधिक घटना होत्या. त्यासाठी योग्य ती पावले उचलण्यात आली असून, लवकरच त्याचा परिणाम दिसून येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
............
आता पिटाअंतर्गत होणार अटक
अमितेश कुमार म्हणाले, कलम १४४ अंतर्गत जारी केलेल्या अधिसूचनेचा कालावधी ९ सप्टेंबरला संपत आहे. आता पोलीस पिटाच्या कलम ७ (१) (ब)नुसार देहव्यापारासाठी प्रतिबंधित परिसरात येणाऱ्या बाहेरील व्यक्तीवर गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात येईल. त्यात कुणी अडथळा आणत असल्यास त्याचा बंदोबस्त करणे पोलिसांना ठाऊक आहे. पोलिसांनी वाद टाळण्यासाठी चर्चेचा मार्ग अवलंबला आहे.
ट्रॅव्हल्स बसविरुद्ध कारवाई
वाहतुकीच्या समस्येबाबत पोलीस आयुक्त म्हणाले, एसटी स्टँडवरून संचालित ट्रॅव्हल्स बस आणि दुसऱ्या वाहनांविरुद्ध कारवाई करण्यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. जड वाहनांना शहराच्या बाहेर पार्क करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ट्रान्सपोर्टरची बैठक बोलावून त्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
..............