विदर्भात पावसाची दडी, शेतकरी चिंतातूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2021 10:53 AM2021-07-06T10:53:29+5:302021-07-06T10:53:51+5:30
Nagpur News मागील तीन ते चार दिवसांपासून विदर्भात पावसाने दडी मारल्यासारखी परिस्थिती आहे. यामुळे शेतकरी चिंतातूर झाले असून सर्वांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील तीन ते चार दिवसांपासून विदर्भात पावसाने दडी मारल्यासारखी परिस्थिती आहे. यामुळे शेतकरी चिंतातूर झाले असून सर्वांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.
मागील २४ तासांत विदर्भात केवळ चंद्रपूर वगळता कुठेही पावसाची नोंद नाही. रविवारी चंद्रपूर जिल्ह्यातील एकदोन ठिकाणी फक्त ५.४ मिमी तुरळक पावसाची नोंद आहे. विदर्भात पेरणी मोठ्या प्रमाणावर झाली असली, तरी दमदार पाऊस न झाल्याने पिके सुकण्याच्या बेतात आहेत. येत्या ४ ते ५ दिवसांत पाऊस झाला नाही, तर शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागू शकते, अशी अवस्था आहे.
दरम्यान, हवामान विभागाने या आठवड्यात नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ९ तारखेपर्यंत पावसाची शक्यता वर्तविली आहे. तर अखेरच्या टप्प्यात अकोला, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज आहे. यंदा दमदार पावसाची अपेक्षा असल्याने शेतकऱ्यांनी उत्साहाने पेरण्या केल्या. मात्र, अपुऱ्या पावसाने शेतकऱ्यांपुढे संकट उभे ठाकण्याची शक्यता आहे.नागपूर जिल्ह्यातही पावसाने दडी मारली आहे. मागील तीन दिवसांपासून पावसाचा पत्ता नाही. धान पऱ्हे तयार असले, तरी रोवणीलायक पाऊस झाला नसल्याने आता पऱ्ह्यांना जगविणे सुरू आहे. धान रोवण्या अडचणीत आल्या आहेत. अन्य पिके चांगली उगवली असली, तरी जमिनीच्या ओलाव्यावर तग धरून आहेत.
नागपूरचे तापमान कालच्यापेक्षा एक अंशाने कमी म्हणजे ३६.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. सकाळपासूनच आकाश निरभ्र होते. उकाडाही चांगलाच वाढलेला होता. सकाळची आर्द्रता ६७ टक्के नोंदविली गेली. सायंकाळीही ६८ टक्के नोंद झाल्याने फारसा फरक नव्हता. ...
विदर्भातील तापमान
जिल्हा : कमाल : किमान
अकोला : ३८.८ : २६.०
अमरावती : ३७.२ : २५.३
बुलडाणा : ३४.४ : २३.५
चंद्रपूर : ३३.४ : २४.४
गडचिरोली : २९.४ : २६.४
गोंदिया : ३५.० : २५.२
नागपूर : ३६.३ : २६.८
वर्धा : ३७.५ : २७.५
वाशिम : ३६.० : २४.०
यवतमाळ : ३७.२ : २१.५
...