राेपवाटिका याेजनेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:12 AM2021-08-28T04:12:20+5:302021-08-28T04:12:20+5:30
रामटेक : राष्ट्रीय कृषी विकास याेजनांतर्गत पुण्यश्लाेक अहिल्याबाई होळकर राेपवाटिका याेजनेच्या माध्यमातून भाजीपाला पिकाला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यास ...
रामटेक : राष्ट्रीय कृषी विकास याेजनांतर्गत पुण्यश्लाेक अहिल्याबाई होळकर राेपवाटिका याेजनेच्या माध्यमातून भाजीपाला पिकाला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. रामटेक तालुक्यात मात्र केवळ एकच राेपवाटिका सुरू झाली आहे. एक राेपवाटिका मंजूर झाली आहे. अनुसूचित जाती संवर्गातील शेतकऱ्यांसाठी एक राेपवाटिका मंजूर आहे. पण या संवर्गातील शेतकरी मात्र याचा लाभ घेण्यासाठी समाेर न आल्याने हे काम रखडले आहे.
प्रत्येक तालुक्यात किमान एक तरी राेपवाटिका उभारणी करायची आहे. रामटेक तालुका मागासलेला असल्याने येथे तीन राेपवाटिका मंजूर झाल्या आहेत. महादुला येथे पहिली राेपवाटिका उभारल्या गेली आहे. गाैरी जातीच्या मिरचीची तेथे लागवड केली आहे. दीड लाख राेपाची पहिली ऑर्डरही शेतकऱ्याला मिळाली आहे. ४० हजार मिरचीची राेपे एकावेळी तयारही झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक फायदा झाला आहे.
या याेजनेद्वारा शेतीपूरक व्यवसायात संधी, नवीन तंत्रज्ञानाचा वापर व पीक रचनेत बदल, आर्थिक उत्पन्न व भाजीपाला उत्पादनात वाढ करणे, अशी शासनाची भूमिका आहे. यासाठी फक्त ०.४० हेक्टर जमीन व पाण्याची कायम साेय असणे आवश्यक आहे.
शेडनेटगृह, प्लास्टिक टनेल, पाॅवर नॅपसॅक स्पेअर व प्लास्टिक क्रेट्स यासाठी ४ लाख ६० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. यासाठी शासनाकडून २ लाख ३० हजार रुपये अनुदान दिले जाते. दाेन टप्प्यात हे अनुदान दिले जाते.
या योजनेंतर्गत रामटेक तालुक्यात तीन राेपवाटिका मंजूर असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी स्वप्निल माने यांनी दिली. महादुला येथे एक राेपवाटिका उभारली आहे. दुसरी राहुल काेठेकर या शेतकऱ्याकडे उभारायची आहे. एक अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. अद्याप यासाठी एकही अर्ज आलेला नाही.