कामबंद आंदोलनाला एसटी कर्मचाऱ्यांकडून 'नो रिस्पॉन्स'
By नरेश डोंगरे | Published: November 6, 2023 03:55 PM2023-11-06T15:55:46+5:302023-11-06T15:57:36+5:30
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी यापूर्वी झालेल्या संपाचे चटके भोगले आहेत.
नागपूर : ऐन दिवाळीच्या तोंडावर कामबंद आंदोलनाचा देण्यात आलेला ईशारा नागपूर विभागात फूसका फटाका ठरला आहे. नागपूर विभागात सर्वच्या सर्व नियोजित फेऱ्या भल्या सकाळपासून सुरू ठेवल्यामुळे कामबंद आंदोलनालाएसटी कर्मचाऱ्यांनी 'रिस्पॉन्स' देण्याचे टाळल्याचेही यातून स्पष्ट झाले.
आधी कोरोना आणि नंतर प्रदीर्घ संप असे दोन फटके बसल्याने राज्यभरातील एसटीचेकर्मचारी पोळून निघाल्यासारखे झाले होते. अशात आता आपल्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी ऐन दिवाळीच्या तोंडावर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघाकडून एसटी कर्मचारी ६ नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलन करणार, अशी घोषणा केली होती. परंतु त्यांच्या या घोषणेला खुद्द एसटी कर्मचाऱ्यांनीच प्रतिसाद दिलेला दिसत नाही.
नागपूर विभागात एसटीची सेवा आज पहाटेपासून सुरळीत सुरु राहावी, यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी आधीच नियोजन केले होते. आंदोलनामुळे प्रवाशांसोबत आपलेही हाल होते, याची प्रचिती आल्याने एसटीच्या कर्मचाऱ्यांनीही कामबंद ठेवण्याऐवजी 'सेवा सुरू'ठेवून या आंदोलनाकडे पाठ फिरविणे पसंत केले.
या पार्श्वभूमीवर, नागपूर विभागात सोमवारी पहाटे ५ वाजतापासून सकाळी ११ पर्यंत एसटीची वाहतुक सुरळीत सुरू होती. कसलीही कोणती गडबड अथवा अनुचित प्रकार कुठे घडला नाही. पहिल्या तीन तासांत पहाटे ५ ते सकाळी ८ या वेळेत प्रत्यक्ष नियोजित असलेल्या १६१ गाड्या नियोजित वेळापत्रकाप्रमाणे धावल्या. कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाल्याने या बसेसच्या संचालनात कोणताही अडथळा आला नाही, असे या संबंधाने बोलताना एसटीचे विभागीय उपमहाव्यवस्थापक श्रीकांत गभणे यांनी लोकमतला सांगितले.
धाक होता, मात्र...
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी यापूर्वी झालेल्या संपाचे चटके भोगले आहेत. याही वेळी संपाची झळ बसते की काय, कठे काही वाद, तोडफोड होते की काय, असा प्रत्येकच अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मनात धाक होता. मात्र कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाला प्रतिसाद दिला नाही. याऊलट सोमवारी मध्यरात्रीनंतरही ठरलेल्या वेळी कर्मचारी कर्तव्यावर हजर झाल्याने एसटीच्या नागपूर विभागात सकाळपासूनच नेहमी असते तशी धावपळ बघायला मिळाली.