तीन-तीन महिने पगार नाही , डा.एड. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी जगावे कसे?
By निशांत वानखेडे | Published: July 22, 2023 03:43 PM2023-07-22T15:43:10+5:302023-07-22T15:43:36+5:30
उधारीवरचा प्रपंच किती दिवस चालणार?
नागपूर : शिक्षकांचे प्रशिक्षण, डी.एड.ची अॅडमिशन आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी लागणारे सर्व प्रयत्न करणाऱ्या ‘डाएड’ कर्मचाऱ्यांच्या नशीबी सरकारी अवहेलना आली आहे. या कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या एक तारखेला नियमित सोडाच पण दोन-दोन, तीन-तीन महिने वेतनच होत नाही. अशा स्थितीत डाएड कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी जगावे तरी कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणेद्वारे प्रत्येक जिल्हा स्तरावर डाएडच्या माध्यमातून राज्यातील शैक्षणिक विभागाचा कारभार चालविला जातो. प्रत्येक जिल्ह्यासाठी एक असे ३३ डाएड राज्यात आहेत व त्यात २० ते २४ कर्मचारी काम सांभाळतात. रिक्त पदे वगळता राज्यात सरासरी ६५० च्या जवळपास डाएडचे कर्मचारी आहेत. कर्मचाऱ्यांच्या मते २०२० पर्यंत सर्वकाही सुरळीत होते. त्यानंतर सर्व विस्कटत गेले. जणू यांना कोरोनाचा विळखा बसला. नियमित पगार जवळजवळ बंद झाले. कर्मचाऱ्यांना तीन-तीन महिने पगारच मिळेना झाले. यावेळीही या कर्मचाऱ्यांचा मे पासूनचा पगार मिळाला नाही व जुलै संपत आला आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागविणेच कठीण झाले आहे.
सर्व गरजा उधारीवरच कराव्या लागतात पण देणारा तरी किती देणार आणि असा उधारीवर किती दिवस प्रपंच चालणार, असा सवाल या कर्मचाऱ्यांना भेडसावत आहे. जिल्हाधिकारी, आयुक्त, शिक्षण सचिवापासून मंत्र्यांपर्यंत सर्वांना निवेदने देऊन झाले पण समस्या काही सुटत नाही. त्यामुळे हे कर्मचारी त्रस्त झाले आहेत. डी.एड. महाविद्यालयांची अवस्था वाईट असताना या विभागातील कर्मचाऱ्यांनाही हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे सरकारने संपूर्ण शिक्षण विभागाचाच खेळखंडोबा करायचा चंग बांधला का, असा संताप व्यक्त होत आहे.
मुलांचे शिक्षण, कर्जाचे, विम्याचे हप्ते भरावे कसे?
सर्व कर्मचाऱ्यांना उधारीवरच गरजा भागवाव्या लागतात. त्यांच्यासमोर मुलांच्या शिक्षणाची सर्वात मोठी समस्या आहे. त्यांना मुलांच्या शाळेची फीस कुठून भरावी हा प्रश्न पडतो. शिवाय गृह कर्ज, इतर कर्ज, विम्याचे हफ्ते भरणेही त्यांना शक्य होत नाही. त्यामुळे अनेकांना बॅंक नोटीसांचा सामना करावा लागत आहे. त्यांचे सिबिल खराब झाले आहे.
बदली झाली पण शिफ्टींगसाठी पैसा नाही
एका कर्मचाऱ्याची नागपूरवरून इतरत्र बदली झाली. मात्र बदलीच्या ठिकाणी कुटुंबाला शिफ्ट करायला या कर्मचाऱ्याकडे पैसा नाही. त्यामुळे त्यांनी महिनाभराच्या सुट्या टाकल्या पण पुढे काय, हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.