शाळेचा पत्ता नाही, फीसाठी मात्र पालकांकडे तगादा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 01:10 AM2020-05-17T01:10:48+5:302020-05-17T01:17:36+5:30
कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी सरकारने सर्वप्रथम शाळा बंद केल्या. त्या कधी सुरू होतील याबद्दल अद्यापही अनिश्चितताच आहे. असे असले तरी काही नामांकित शाळा व्यवस्थापनांनी पालकांना २०२०-२१ या सत्रासाठी फी चे स्ट्रक्चर व्हॉटसअॅपवर पाठविले आहे. या फीचा पहिला हप्ता भरण्यास व्हॉटसअॅप आणि मोबाईल मॅसेजच्या माध्यमातून तगादा लावला आहे. यासंदर्भात पालक समितीकडे तक्रारी वाढल्या आहे. शाळा सुरू होण्याबाबत अनिश्चितता असताना फी कशी भरणार असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी सरकारने सर्वप्रथम शाळा बंद केल्या. त्या कधी सुरू होतील याबद्दल अद्यापही अनिश्चितताच आहे. असे असले तरी काही नामांकित शाळा व्यवस्थापनांनी पालकांना २०२०-२१ या सत्रासाठी फी चे स्ट्रक्चर व्हॉटसअॅपवर पाठविले आहे. या फीचा पहिला हप्ता भरण्यास व्हॉटसअॅप आणि मोबाईल मॅसेजच्या माध्यमातून तगादा लावला आहे. यासंदर्भात पालक समितीकडे तक्रारी वाढल्या आहे. शाळा सुरू होण्याबाबत अनिश्चितता असताना फी कशी भरणार असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.
शहरातील नामांकित शाळांचे वर्ग ५ ते ८ चे शैक्षणिक शुल्क वार्षिक ३० ते ६० हजारापर्यंत आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार व उत्पन्नाची साधने बंद झाली आहे. गेल्या शैक्षणिक सत्रात कोरोनामुळे परीक्षा सुद्धा झाल्या नाही. सरकारने कोरोनाचे संक्रमण पसरू नये म्हणून सर्वात पहिले शाळा बंद केली. सध्या शहरातील परिस्थिती लक्षात घेता दरवर्षी २६ जून रोजी सुरू होणाºया शाळा यंदा वेळेत सुरू होईल, याची शक्यताच नाही. काही शाळांनी विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रविष्ट करून आॅनलाईनद्वारे शिकवणी सुरू केली. त्याच आधारे संपूर्ण वर्षभराच्या फी चे स्ट्रक्चर पालकांच्या मोबाईलवर टाकले. पालक त्यामुळे संतप्त झाले आहे.
दुसरीकडे शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी शाळांना पालकांकडून शुल्क जमा करण्यास घाई करू नये. गेल्या शैक्षणिक सत्रातील राहिलेले शुल्काचे किश्त पाडून घ्यावे व नव्या सत्रासाठी शाळांनी शुल्कही वाढवू नये असे पत्र काढले आहे.
शाळांनी पालकांना पाठविलेल्या मॅसेजमध्ये फी दरवाढ न केली नसल्याचे सांगितले आहे. परंतु संपूर्ण सत्राची फी आकारली आहे. यासंदर्भात नागपुरात कार्यरत आरटीई अॅक्शन कमिटी व जागृत पालक परिषदेकडे मोठ्या प्रमाणात पालकांच्या तक्रारी आल्या आहे.
आमच्याकडे पालकांच्या तक्रारी आल्या आहे. पालकांनी आम्हाला शाळांनी पाठविलेल्या फीचे शेड्युल पाठविले आहे. मुळात शाळेच्या फी संदर्भात सरकारने शासन निर्णय काढला आहे. पण काही शाळा व्यवस्थापनाकडून पालकांना शैक्षणिक शुल्कासाठी त्रास दिला जातो आहे. तो चुकीचा आहे. जोपर्यंत शाळा सुरू होत नाही, तोपर्यंत पालकांना फी साठी त्रास देऊ नये असे पत्र शिक्षणाधिकाऱ्यांनी काढणे गरजेचे आहे.
मो. शाहीद शरीफ, अध्यक्ष, आरटीई अॅक्शन कमिटी
मुळात शाळा व्यवस्थापनांनी शिक्षकांना कामाला लावले आहे. मुलांनी फी न भारल्यास वेतन कसे देणार असे शिक्षकांना सांगितले आहे. त्यामुळे शिक्षक पालकांकडे तगादा लावत आहे. आमच्याकडेही अशा पालकांच्या तक्रारी आल्या आहेत. पण आम्ही पालकांना स्पष्ट केले की, त्या मॅसेजकडे लक्ष देऊ नये.
गिरीश पांडे, अध्यक्ष, जागृत पालक परिषद
पालकांनी फी भरूच नये
आम्ही शाळांना फी वाढ करू नये असे पत्र पाठविले आहे. शाळांकडून पालकांना फी भरण्यासंदर्भात मॅसेज येत असले तरी पालकांनी फी भरू नये, शाळा फी भरली नाही म्हणून प्रवेश रद्द करू शकत नाही. शाळा सुरू झाल्यानंतरच फी बाबतीत शाळांनी निर्णय घ्यावा, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी सांगितले.