ना लाज, ना भीती; रामगिरी-वॉकर स्ट्रीटवर चालतात कपल्सचे चाळे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2022 01:18 PM2022-08-04T13:18:38+5:302022-08-04T13:26:16+5:30
संध्याकाळ होताच, स्थिती आणखीनच बिकट झालेली दिसून येते.
- सुरभी शिरपूरकर
नागपूर : शहरातील काही रस्ते आता डोळे उघडे ठेऊन चालण्यासारखे राहिलेले नाहीत. कधीकाळी झुडपाआड प्रेमचाळे करणारे कपल्स आता चक्क रस्त्याच्या कडेला बसून निर्लज्जपणे चाळे करत असतात. हे बेताल आणि किळसवाणे वर्तन सर्रास चालत असूनही याची दखल कुणी घेत नसल्याने समाजमन चिंतित आहे.
पोलीस जिमखाना, पोलीस आयुक्तालय, मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या भागात सर्वाधिक सुरक्षा व्यवस्था असल्याने परिसर सर्वाधिक सुरक्षित असतो, अशी सर्वांची धारणा असली तरी नेमके याच परिसरात असे प्रकार सर्रास घडतात, ही वस्तूस्थिती आहे. लेडीज क्लब गार्डन ते सेमिनरी हिल्स-जपानी गार्डनकडे जाणाऱ्या या सिव्हिल लाईन्स परिसरात अनेक जोडपे दिवसाढवळ्या अश्लील कृत्य करताना आढळून येतात. संध्याकाळ होताच, स्थिती आणखीनच बिकट झालेली दिसून येते.
‘लोकमत’ने घेतलेल्या आढाव्यात ही बाब स्पष्ट झाली. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास आमच्या प्रतिनिधीने टेहळणी केली असता मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ‘रामगिरी’, पोलीस जिमखाना, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अनेक शासकीय अधिकाऱ्यांची निवासस्थाने असलेल्या या रामगिरी-वॉकर स्ट्रीटवर बरीच जोडपी अश्लील चाळे करताना आढळले. विशेष म्हणजे, याच परिसरात असलेल्या ग्रीन जिमवर लहान मुलांसोबत त्यांचे पालकही व्यायाम करण्यासाठी येत असतात. वॉकर स्ट्रीट असल्यामुळे या रस्त्यावर सकाळी व संध्याकाळच्या सुमारास वॉकिंग व रनिंगसाठी अनेक नागरिक येत असतात. या सर्वांसमोरच ही जोडपी आपल्या भावनांना मोकळीक देत असल्याचे निदर्शनास येत असते.
येथूनच तेलंगखेडी उद्यानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सीपी क्लबही आहे. हा रस्ता संध्याकाळच्या सुमारास अतिशय अंधारलेला आणि नीरव शांतता असलेला असतो. अंधार पडताच, या रस्त्यावर अनेक जोडपी मर्यादा ओलांडत असल्याचेही दिसून येते. अनेक टवाळखोर अशा कपल्सचा गैरफायदाही घेत असल्याचे दिसून येते. मात्र, स्वत:च गैरकृत्य करत असल्याने तक्रारी करण्याचे टाळले जाते. याकडे ना प्रशासनाचे ना पोलिसांचे लक्ष आहे. या भागात येणाऱ्या नागरिकांना नाइलाजाने हे सगळे कृत्य बघण्याशिवाय पर्याय नसतो.