नागपुरात सकाळी ११ नंतर ‘नो शटडाऊन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 10:52 AM2018-04-28T10:52:49+5:302018-04-28T10:52:58+5:30

शहरातील वाढते तापमान बघता महावितरणच्या नागपूरकर वीज ग्राहकांची दुपार सुसह्य करण्याचा निर्णय महावितरणने घेतला असून देखभाल व दुरुस्तीचे काम तूर्तास उर्वरित उन्हाळभर सकाळी ११ च्यापूर्वी केले जाणार आहे

No shutdown after 11 am in Nagpur | नागपुरात सकाळी ११ नंतर ‘नो शटडाऊन’

नागपुरात सकाळी ११ नंतर ‘नो शटडाऊन’

Next
ठळक मुद्देमहावितरणचा निर्णय : ‘हिट अ‍ॅक्शन प्लॅन’

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील वाढते तापमान बघता महावितरणच्या नागपूरकर वीज ग्राहकांची दुपार सुसह्य करण्याचा निर्णय महावितरणने घेतला असून देखभाल व दुरुस्तीचे काम तूर्तास उर्वरित उन्हाळभर सकाळी ११ च्यापूर्वी केले जाणार आहे
मान्सूनपूर्व तयारीच्या कामात महावितरणने गती पकडली आहे. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करावयाची याशिवाय नियमित देखभाल व दुरुस्तीसोबतच महामेट्रोच्या अत्यावश्यक कामांसाठी वेगवेगळ्या भागातील वीजपुरवठा रीतसर पूर्वसूचना देऊन काही वेळेपुरता स्थगित केल्या जात आहे. अनेकदा दुपारभर ही कामे चालत असल्याने संबंधित भागाचा वीजपुरवठा काही तासांसाठी बंद केला जातो, मात्र मागील काही दिवसांपासून नागपुरात अंग पोळून काढणारे तापमान बघता देखभाल व दुरुस्तीचे कामासाठी सकाळी ११ वाजताच्या पुढे वीजपुरवठा खंडित न करण्याचा निर्णय महावितरणच्या काँग्रेसनगर विभागाने घेतला आहे. यामुळे देखभाल व दुरुस्तीच्या सर्व कामांकरिता नागपुरातील महावितरणच्या ग्राहकांना पूर्वसूचना देऊन सकाळी ११ पूर्वीच वीजपुरवठा बंद केला जाणार आहे.
मागील काही दिवसांपासून नागपूरकरांना प्रचंड उन्हाळ्याला सामोरे जावे लागत आहे. पाऱ्याने सातत्याने चाळीशी ओलांडली आहे. अशावेळी देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी वीजपुरवठा बंद केल्याने ग्राहकांना प्रचंड मनस्ताप होतो, सोबतच देखभाल व दुरुस्तीच्या कामावरील कर्मचाऱ्यांनाही कडक उन्हाचा त्रास होतो, हे लक्षात घेता किमान उन्हाळ्यात तरी वीज ग्राहकांना यात दिलासा मिळावा याकरिता महावितरणच्या शहर मंडळाचे अधीक्षक अभियंता मनीष वाठ आणि काँग्रेसनगर विभागाचे कार्यकारी अभियंता कुंदन भिसे यांनी हा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी यापूर्वीच सुरू करण्यात आली असून प्रचंड उष्णता व विजेचा वाढीव भार यामुळे वीज वितरण यंत्रणेत एखादा तांत्रिक दोष निर्माण झाल्यास दुपारीही वीजपुरवठा खंडित होऊ शकतो.

महावितरणची एसएमएस सेवा
मीटर रिडींग, वीज देयक, वीजपुरवठा खंडित, बिल भरण्याची मुदत आदीबाबत माहिती देण्यासाठी इंग्रजीसोबतच मराठी भाषेतील एसएमएस देण्याची सुविधा महावितरणने आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली असल्याने महावितरण ग्राहकाला इंग्रजी किंवा मराठी एसएमएसचा पर्याय निवडता येतो. ग्राहकाने ग्राहक क्रमांक टाईप करून ९२२५५९२२५५ या क्रमांकावर पाठवावा.

Web Title: No shutdown after 11 am in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.