सोयाबीन नाही घरी अन् दर गेले गगनावरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:07 AM2021-07-24T04:07:44+5:302021-07-24T04:07:44+5:30

आठ हजार झाले पार, अल्प उत्पादन, आयात बंद : फूड उत्पादनात वाढला वापर उमरेड : तेलबियांमध्ये गणले जाणारे आशिया ...

No soybeans, Gaganavari went inside the house! | सोयाबीन नाही घरी अन् दर गेले गगनावरी!

सोयाबीन नाही घरी अन् दर गेले गगनावरी!

Next

आठ हजार झाले पार, अल्प उत्पादन, आयात बंद : फूड उत्पादनात वाढला वापर

उमरेड : तेलबियांमध्ये गणले जाणारे आशिया खंडातील कडधान्य गटातील वनस्पती असलेल्या सोयाबीनचे दर गगनावरी पोहोचले आहेत. गुरुवारी उमरेडच्या बाजार समितीमध्ये तब्बल ८,२६० रुपये प्रती क्विंटल अशी सोयाबीनची विक्रमी नोंद झाली. सोयाबीन उत्पादकांसाठी ही आनंदाची बातमी असली तरी मागील हंगामातील सोयाबीन फारसे कुणाजवळ उरले नाही आणि नवीन उत्पादन बाजारपेठेत धडकण्यास तब्बल दोन ते अडीच महिन्याचा कालावधी आहे. सध्या ‘सोयाबीन नाही घरी अन् दर गेले गगनावरी’ अशी परिस्थिती आहे. यामुळे सध्यातरी हे विक्रमी दर शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण टाकणारेच ठरले आहे.

अमेरिका, अर्जेंटिना आणि ब्राझील हे सोयाबीनचे मुख्य उत्पादक देश मानले जातात. भारतासह आशिया खंडातील अन्य देश सुद्धा सोयाबीन उत्पादनाबाबत आघाडीवर आहेत. मागील हंगामात अमेरिका, अर्जेंटिना आणि ब्राझील येथे सोयाबीनचे उत्पादन अत्यल्प झाले. भारतात सुद्धा उत्पादन कमालीचे घटले. दुसरीकडे सोयाबीनच्या डीओसीची (ढेप) मागणी प्रचंड वाढली. उत्पादनास फटका बसल्याने सोयाबीन तेलाचे दर सुद्धा चांगलेच पेटले. शिवाय भारताने सोयाबीनचे तेल आयात न केल्यानेही तेलाच्या दरात वाढ झाली.

साधारणत: सप्टेंबर अखेरीस सोयाबीन बाजारपेठेत धडकतो. मागील हंगामात अगदी सुरुवातीला ३,८०० रुपये प्रती क्विंटल दर सोयाबीनला मिळाले. त्यानंतर लगेच ४ हजार आणि काही काळ पाच हजारावर सुद्धा स्थिरावले. अशातच पेरणीचा हंगाम लागला. शेतकऱ्यांकडील उरलेसुरले बियाणे सुद्धा संपले. आता सोयाबीन संपल्यात जमा असतानाच अभूतपूर्व ८,२६० रुपयांचा भाव ‘सोन्याहून पिवळे’ असाच आहे. तूर्त शेतकऱ्यांच्या नशिबी हा भाव नसला तरी सोयाबीनच्या दरात अशीच तेजी कायम राहो, अशी प्रार्थना केली जात आहे.

फूड उत्पादनात अग्रेसर

सोयाबीनचे अन्नपदार्थ शरीरामधील फायबर आणि प्रथिनांची कमतरता भरून काढतात. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सोयाबीन उत्तम असल्याचे भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांनीही स्पष्ट केले आहे. शिवाय कोरोना काळात सोयाबीनकडे अनेकांचे लक्ष वेधल्या गेले. भरपूर प्रोटीनयुक्त असलेल्या सोयाबीनपासून केवळ तेलच नव्हे तर डिओसी आणि आता अलीकडे मोठ्या प्रमाणावर फूडमध्ये सुद्धा वापर वाढला. फूड उत्पादनात सोयाबीन अग्रेसर असल्याने निश्चितच ‘उत्पादन कमी आणि दर गगनावरी’ असा प्रकार बघावयास मिळत आहे, असे मत महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. विजय खवास यांनी व्यक्त केले.

सहा हजाराच्या आसपास

सध्या हिरवाकंच सोयाबीनचा मळा शेतात डोलत आहे. सप्टेंबर अखेरीस सोयाबीन बाजारपेठेत पोहोचेल. अशावेळी सहा हजार रुपये प्रती क्विंटलच्या आसपास दर राहतील, असा अंदाज वर्तविला जात आहे. सोयाबीन कारखानदारांनी १५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ६,८०० रुपये प्रती क्विंटल असे दर निर्धारित केले आहे. वायदा बाजार ६,८०० रुपये दाखवित असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आता शेतातून घरापर्यंत सोयाबीन कसा पोहोचतो यावर आणि निसर्गावरही सारेकाही अवलंबून आहे.

--

उमरेड येथील सतीश चकोले यांच्या शेतातील हिरवेकंच बहरलेले सोयाबीन.

Web Title: No soybeans, Gaganavari went inside the house!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.