‘नो स्टोन, नो फायर, वुई वाँट सीएए एव्हरीव्हेअर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 12:00 PM2019-12-23T12:00:28+5:302019-12-23T12:01:58+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमी असलेल्या नागपुरात रविवारी या कायद्याच्या समर्थनार्थ हजारो नागरिक रस्त्यावर उतरले व भव्य रॅलीच्या माध्यमातून या कायद्याच्या पाठीशी सामान्य जनता आहे, असा संदेश देण्यात आला.

'No Stone, No Fire, Why Want CAA Everywhere' | ‘नो स्टोन, नो फायर, वुई वाँट सीएए एव्हरीव्हेअर’

‘नो स्टोन, नो फायर, वुई वाँट सीएए एव्हरीव्हेअर’

Next
ठळक मुद्देनागपूरकरांचा भव्य ‘हुंकार’आमचे समर्थन ‘सीसीए’ला!नागरिकत्व सुधारणा कायदा हवाच!दहा हजारांवर सर्वधर्मीय नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिस्तबद्ध चाल, घोषणांमधील एकवाक्यता, देशभक्तीचा हुंकार अन् भारतमातेचा जयघोष. कुणाचा धर्म वेगळा, कुणाचा पंथ वेगळा तर कुणाच्या हातातील झेंड्याच्या रंगदेखील वेगळा. परंतु सर्वांच्या तोंडी नाव देशाचेच. यशवंत स्टेडियम ते संविधान चौक या मार्गावर रविवारी सकाळच्या सुमारास जागोजागी हेच चित्र होते. नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन देशभरातील राजकारण तापले असून या कायद्याचा अनेकांनी विरोधदेखील केला. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमी असलेल्या नागपुरात रविवारी या कायद्याच्या समर्थनार्थ हजारो नागरिक रस्त्यावर उतरले व भव्य रॅलीच्या माध्यमातून या कायद्याच्या पाठीशी सामान्य जनता आहे, असा संदेश देण्यात आला.
हिवाळी अधिवेशनाच्या काळात सीएएच्या विरोधात मुस्लीम समाजाने लक्षवेधी मोर्चा काढल्यानंतर, त्याला प्रत्युत्तर म्हणून लोकाधिकार मंचच्या नेतृत्वात सीएएच्या समर्थनात मार्च काढण्यात आला. यशवंत स्टेडियम येथून सुरू झालेल्या या मार्चमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाचा हातात तिरंगा, भारतीय जनता पक्षाचा झेंडा, काहींजवळ रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा, तर कुठे भगवाही झळकताना दिसला. कुठे छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार तर कुठे मोदी, शहांचा जयघोषही होताना दिसला. यशवंत स्टेडियममधून निघालेली रॅली पंचशील चौक होत, संविधान चौकात पोहचली. रॅलीचा एक टोक संविधान चौकात तर दुसरे टोक पंचशील चौकात यावरून रॅलीची भव्यता दिसून आली. लोकाधिकार मंचने केलेल्या आवाहनावर जनसमुदाय सीएएच्या समर्थनात रस्त्यावर आला होता. या रॅलीमध्ये सर्वच जनसमुदायाचे लोक सहभागी झाले होते. रिपब्लिकन पक्षाचे निळे झेंडे त्याची प्रचिती देत होते. रॅलीत सहभागी झालेल्यांबरोबरच रस्त्याच्या दुतर्फाही लोकांनी गर्दी करून रॅलीला समर्थन दिले. रॅली संविधान चौकात पोहोचल्यावर सभेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी संविधान चौकात प्रचंड गर्दी झाली होती. रॅलीत महापौर संदीप जोशी, माजी ऊर्जा तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार विकास महात्मे, आमदार अनिल सोले, गिरश व्यास, मोहन मते, भाजपाचे शहर अध्यक्ष प्रवीण दटके, ग्रामीण अध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, नगरसेवक विक्की कुकरेजा, संजय बंगाले, बाल्या बोरकर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला नगरसेवक व नगरसेविका सहभागी होत्या.
महिलांनी केले रॅलीचे नेतृत्व
या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. पण रॅलीच्या नेतृत्वाची दोरी महिलांच्या हातात होती. प्रत्येक महिलेच्या हातात भगवा ध्वज व सीएएच्या समर्थनार्थ फलक झळकत होते. भारतमातेची वेशभूषा करून विद्यार्थिनी आणि भारत मातेचे पोस्टर्स रॅलीत होते. वंदेमातरम, भारत माता की जय, असा जयघोष सातत्याने महिलांकडून होत होता. माजी महापौर नंदा जिचकार, अर्चना डेहनकर, माया इवनाते यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने महिला रॅलीत सहभागी झाल्या होत्या.

Web Title: 'No Stone, No Fire, Why Want CAA Everywhere'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.