शासकीय व सार्वजनिक कार्यक्रमांत धर्मांची प्रतीके नकोत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:08 AM2021-01-22T04:08:06+5:302021-01-22T04:08:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शासकीय व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये कुठल्याही एका विशिष्ट धर्माच्या प्रतीकांचा वापर करण्यात येऊ नये. सार्वजनिक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये कुठल्याही एका विशिष्ट धर्माच्या प्रतीकांचा वापर करण्यात येऊ नये. सार्वजनिक व शासकीय कार्यक्रम हे धर्मनिरपेक्ष असावेत, असे आवाहन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत केले.
प्रख्यात कवी यशवंत मनोहर यांनी विदर्भ साहित्य संघ, नागपूरतर्फे देण्यात येणारा जीवनव्रती पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला. प्रस्तावित पुरस्कार सोहळ्यात सरस्वती पूजन त्यांना मान्य नसल्याने त्यांनी हा पुरस्कार नाकारला. त्यांच्या या निर्णयाचे आम्ही समर्थन करतो. स्वागत करतो. मनोहर यांनी घेतलेली भूमिका अगदी योग्य आहे, असेही थोरात यांनी स्पष्ट केले.
देशात मागील काही वर्षांपासून सार्वजनिक सोहळ्यामध्ये एका विशिष्ट धर्माच्या प्रतीकांचा वापर वाढला आहे. हे धर्मनिरपेक्षतेचे उल्लंघन असून शासकीय व सार्वजनिक क्षेत्र काेणत्याही धर्माच्या वापरापासून मुक्त असावे, असे त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेत डॉ. कृष्णा कांबळे, डॉ. त्रिलोक हजारे, प्रदीप नगरारे, अमन कांबळे उपस्थित होते.
राजस्थानमधील मनूचा पुतळा हटवा
राजस्थान उच्च न्यायालयासमोरील मनूचा पुतळा हटविण्यात यावा, तसेच पंतप्रधान रिसेप्शन रूममधील कमानीवरील पेंटिंगची जागा धर्मनिरपेक्ष थीमने बदलवण्यात यावी, अशी मागणीही सुखदेव थोरात यांनी यावेळी केली.