नळाला नाही पाणी अन् हजारो लिटरची होतेय नासाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:10 AM2021-02-25T04:10:01+5:302021-02-25T04:10:01+5:30
- ओसीडब्ल्यूचा प्रताप : नागरिकांचा सवाल खड्डा कधी बुजवणार! लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ईश्वरनगर परिसरातील शिव मंदिराच्या मागे ...
- ओसीडब्ल्यूचा प्रताप : नागरिकांचा सवाल खड्डा कधी बुजवणार!
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ईश्वरनगर परिसरातील शिव मंदिराच्या मागे ओसीडब्ल्यूने खोदलेल्या खड्ड्यातून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. याच परिसरात नळाला पाणी नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. अशा स्थितीत एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी वाचविण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
या परिसरात नळाला पाणी कमी असते. त्याबाबतच्या वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर गेल्या चार दिवसांपासून सगणे गुरुजी व नितीन ठाकरे यांच्या घरापुढे ओसीडब्ल्यूने खोदलेल्या खड्ड्यातून हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. शिवाय, नळाला पाणी पुरवठा बंद झाला आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले आहे; मात्र त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. शिवाय, रमणा मारोती रोडवरसुद्धा बऱ्याच दिवसांपासून खड्डा खोदून ठेवण्यात आला आहे. ज्योती शाळेजवळही असाच खड्डा खोदण्यात आला आहे. मेन्टेनन्सचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे; मात्र या खड्ड्यामुळे कधीही धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नळाचा पाणी पुरवठा सुरळीत करावा, वाया जात असलेल्या पाण्याची बचत करावी आणि खोदून ठेवलेले खड्डे तत्काळ प्रभावाने बुजविण्याची मागणी नागरिक सगणे गुरुजी, नितीन ठाकरे, परमेश्वर राऊत, शरद वानखेडे, महादेव बांडाबुचे, चंद्रकांत हिंगोले, मनोजी सोरते, हरी खापरे, गजानन काकडे, पटले, अजय पराते यांनी केली आहे.