नागपुरात धावते विना तिकीट बस; भरारी पथक झाले थक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 11:03 AM2018-08-08T11:03:50+5:302018-08-08T11:08:38+5:30
तोट्यातील आपली बसला सावरण्यासाठी महापालिके चा संघर्ष सुरू आहे. होत असलेला तोटा कमी कसा करता येईल, यावर पर्याय सापडलेला. यादरम्यान महापालिकेच्या भरारी पथकाच्या तिकीट तपासणीत धक्कादायक प्रकार निदर्शनास आले आहेत.
राजीव सिंह।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तोट्यातील आपली बसला सावरण्यासाठी महापालिके चा संघर्ष सुरू आहे. होत असलेला तोटा कमी कसा करता येईल, यावर पर्याय सापडलेला. यादरम्यान महापालिकेच्या भरारी पथकाच्या तिकीट तपासणीत धक्कादायक प्रकार निदर्शनास आले आहेत. सोमवारी पथकाने बर्डी ते शांतिनगर मार्गावर धावणाऱ्या एका बसची तपासणी केली असता बसमध्ये प्रवासी होते, परंतु एकाही प्रवाशाकडे तिकीट नव्हते. तिकीट चोरीचे असे अनेक प्रकार सुरू असून याला वेळीच आळा घालण्यासाठी पारदर्शी तिकीट पद्धत नसल्यास बस तोट्यातून बाहेर पडणे शक्य होणार नाही.
बर्डी ते शांतिनगरच्या बस क्रमांक ४१२ मध्ये ३७ प्रवासी होते. या बसची पथकाने सोमवारी बालभारतीजवळ तपासणी केली असता एकाही प्रवाशाकडे तिकीट नसल्याचे आढळून आले. दररोज असे शेकडो प्रवासी विना तिकीट प्रवास करतात. परंतु महापालिकेची सक्षम यंत्रणा नसल्याने मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. बस संचालनाची जबाबदारी असलेल्या आयबीटीएम आॅपरेटर डिम्ट्स या प्रकाराला सर्वस्वी जबाबदार आहे. चालक आॅपरेटरने नियुक्त केले आहेत.
या आॅपरेटरच्या अनागोंदीमुळे हा प्रकार सुरू आहे. विना तिकीट प्रवास करण्याचे प्रकार थांबले तर बसचा तोटा कमी होऊ शकतो. डिम्ट्सच्या उदासीन कार्यपद्धतीमुळे महापालिकेच्या परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी गेल्या आठवड्यात आयुक्त वीरेंद्र सिंह यांची भेट घेतली व त्यांच्या संमतीनंतर दोन भरारी पथक गठित केले. यामुळे तिकीट चोरीचा प्रकार उाडकीस आला.
भरारी पथकांच्या माध्यमातून बसची तपासणी सुरूच राहणार आहे. महापालिकेत मनुष्यबळाची कमतरता आहे. पथकासाठी कर्मचारी उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. कर्मचारी उपलब्ध न झाल्यास परिवहन समितीच्या सदस्यांना यात सहभागी करून कारवाई सुरू ठेवणार आहे. तोटा कमी करणे हाच हेतू आहे
- बंटी कु कडे, सभापती परिवहन समिती