'आपली बस'ची तिकीट दरवाढ नाही, वर्षअखेरपर्यंत ताफ्यात येणार १४४ इलेक्ट्रिक बसेस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 11:37 AM2023-02-25T11:37:30+5:302023-02-25T11:38:17+5:30

नागपूरकरांना दिलासा : परिवहन विभागाने सादर केले ३५९.०८ कोटींचे बजेट

no tickets hike in aapli bus,144 electric buses to be conduct in nagpur by the end of the year | 'आपली बस'ची तिकीट दरवाढ नाही, वर्षअखेरपर्यंत ताफ्यात येणार १४४ इलेक्ट्रिक बसेस

'आपली बस'ची तिकीट दरवाढ नाही, वर्षअखेरपर्यंत ताफ्यात येणार १४४ इलेक्ट्रिक बसेस

googlenewsNext

नागपूर :नागपूर महापालिकेच्या परिवहन विभागाने २०२३-२४ चे ३५९.०८ कोटीचे अंदाजपत्रक प्रशासकाला सादर केले. या अंदाजपत्रकात आपली बसची यंदा कुठलीही दरवाढ सुचविली गेली नाही. विशेष म्हणजे राज्य व केंद्र सरकारने इलेक्ट्रिक व्हेईकलवर जास्त भर असल्याने मनपाच्या परिवहन विभागाने १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून १४४ इलेक्ट्रिक बसेससाठी पीएमआय कंपनीसोबत करार केला आहे. वर्षाच्या शेवटीपर्यंत या बसेस ‘आपली बस’च्या ताफ्यात येणार आहेत.

अंदाजपत्रक संदर्भात माहिती देताना परिवहन व्यवस्थापक रवींद्र भेलावे म्हणाले की, स्मार्ट सिटी विकास निधीतून ४० वातानुकूलित बसेस पुरविण्यात येणार असून, १५ बसेस मनपाला प्राप्त झाल्या आहेत. १४४ इलेक्ट्रिक बसेससाठी पीएमआय कंपनी वाठोड्यात १० एकरमध्ये डेपो विकसित करीत आहे. महापालिका प्रशासनाने २०२५ पर्यंत आपल्या बसच्या ताफ्यातून डिझेल बसेस बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेच्या ताफ्यात वर्षाच्या शेवटीपर्यंत २३० इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार असून, सर्व बसेसला चार्जिंग करता यावे म्हणून मनपाच्या हद्दीत ८ ठिकाणी पर्यायांची चार्जिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. पीएमआय बस निर्माण कंपनी ज्या इलेक्ट्रिक बसेस मनपाला देणार आहे. त्यात अपंगांना चढणे, उतरणे आणि बसणे ही सोयीचे होणार आहे. मनपाने जानेवारी २०१९ मध्ये तिकीट दरात वाढ केली होती. त्यानंतर जुलै २०२२ मध्ये दोन रुपयांनी तिकीट वाढविली होते. यंदा कुठलीही तिकीट वाढ होणार नसल्याचे भेलावे म्हणाले. पत्रपरिषदेला प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, लेखाधिकारी, विनय भारद्वाज, सह. लेखा अधिकारी समीर परमार उपस्थित होते.

आपली बसच्या सवलती

  • ६६ टक्के विद्यार्थ्यांना सूट
  • ५० टक्के ज्येष्ठ नागरिकांना सूट
  • दिव्यांगांना बस प्रवास फ्री
  • माजी सैनिकांना बस प्रवास फ्री

 

- टॅप इन टॅप आऊटचा चांगला परिणाम

परिवहन विभागाने तंत्रज्ञानाचा वापर करून तिकीट चोरीला आळा बसविण्यासाठी ‘ टॅप इन व टॅप आऊट ’ ही यंत्रणा १० बसेसवर लावली होती. त्या यंत्रणेचे चांगले परिणाम दिसून आले आहे. आलेल्या परिणामाचे विश्लेषण करून ही यंत्रणा अन्य बसेसमध्ये लावण्यात येईल का ? यावरही विचार करण्यात येणार असल्याचे भेलावे म्हणाले.

- २०२२-२३ च्या अंदाजपत्रक

  • अंदाजपत्रक ३५२.९ कोटी
  • खर्च ३५१.८८ कोटी
  • उत्पन्न २३९.१९ कोटी
  • तूट - ११३.१७ कोटी

 

- मोरभवन बसस्थानकाच्या विकासासाठी १२ कोटींची तरतूद

मोरभवनच्या ५ एकर जमिनीवर बसस्थानक विकसित करण्यासंदर्भात असलेला अडथळा दूर झाला आहे. राज्याच्या वृक्ष प्राधिकरणाने तेथील १०२४ झाडे तोडण्यास परवानगी दिली आहे. त्या बदल्यात मनपा पर्यायी वृक्ष लागवड करणार आहे. या बजेटमध्ये मोरभवनचा विकास करण्यासाठी १२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे सीताबर्डी परिसरात रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या बसेसच्या पार्किंगचा प्रश्न सुटणार आहे.

- इलेक्ट्रिक बसेस वाढल्यानंतर ही विभाग तोट्यातच

डिझेल बसला ९० रुपये प्रति किलोमीटर खर्च येत आहे. सीएनजीसाठी मनपाला १०० रुपये मोजावे लागत आहे. पण इलेक्ट्रिक बसेससाठी ६० रुपये खर्च येत असतानाही मनपाची तूट भरून निघणार नाही. कारण ५२ सिटर डिझेलच्या बसला ९० रुपये लागतात. तर २६ सिटर इलेक्ट्रिक बसला ६० रुपये खर्च येतो. जिथे एक डिझेल बसचा वापर होतो. तिथे आता दोन बसेस सोडाव्या लागतील. त्याचबरोबर इलेक्ट्रिक बसच्या खरेदीचा खर्चही डिझेल बसपेक्षा तिप्पट आहे. वेटलिजवर बसेस खरेदी करण्यात येत असल्याने, विभागाला तूट भरून काढणे शक्य नाही. मनपा ही सेवा सार्वजनिक हितासाठी संचालित करते. विभागाला स्थापनेपासूनच तोट्यात आहे. आपली बसचे मुख्य स्त्रोत तिकीट विक्री आहे. जाहिरातीतून खूप झाले तर १ कोटीचे उत्पन्न होते.

- रवींद्र भेलावे, परिवहन व्यवस्थापक, महापालिका परिवहन विभाग

Web Title: no tickets hike in aapli bus,144 electric buses to be conduct in nagpur by the end of the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.