सेटिंगने नाही,सर्वेनुसारच तिकीट

By admin | Published: October 17, 2016 02:37 AM2016-10-17T02:37:05+5:302016-10-17T02:37:05+5:30

महापालिकेच्या निवडणुकीत कुणालाही तिकीटासाठी शब्द देऊ नका. कुणालाही शिफारस, वशिला किंवा सेटिंगने तिकीट मिळणार नाही.

No tickets, tickets on surveillance | सेटिंगने नाही,सर्वेनुसारच तिकीट

सेटिंगने नाही,सर्वेनुसारच तिकीट

Next

गडकरी-फडणवीसांनी आखली रणनीती : भाजपच्या स्थानिक नेत्यांसोबत वाड्यावर बैठक
नागपूर : महापालिकेच्या निवडणुकीत कुणालाही तिकीटासाठी शब्द देऊ नका. कुणालाही शिफारस, वशिला किंवा सेटिंगने तिकीट मिळणार नाही. पक्षातर्फे लवकरच शहरात आणखी दोन सर्वे करून प्रभागनिहाय अहवाल मागविले जातील. यात विद्यमान नगरसेवकांचे काम चांगले नसल्याचे समोर आले तर कशाचीही पर्वा न करता उमेदवार बदलला जाईल. विजयी होण्याची क्षमता असलेल्या सामान्य कार्यकर्त्याला तिकीट दिले जाईल. हा जवळचा, तो दूरचा असे असे चालणार नाही, असे एकसुरात स्पष्ट करीत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्यांना महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे निर्देश दिले.

महापालिका निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या महालातील वाड्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत गडकरी- फडणवीस यांनी एकासुरात प्रत्येक जागा जिंकणे भाजपसाठी महत्त्वाचे असल्याचे सांगत उमेदवारीबाबत कुणाशीही तडजोड करणार नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे गडकरी-फडणवीस यांच्यात मतभेद असल्याची चर्चा पिकवून , मी तुमचाच निष्ठ आहे हे भासवून आपली पोळी शेकू पाहणाऱ्यांना या दोन्ही नेत्यांनी आज या बैठकीच्या माध्यमातून सावध होण्याचा इशाराच दिला आहे.
बैठकीत गडकरी म्हणाले, पक्षातील किंवा बाहेरच्या कुठल्याही कार्यकर्त्याला महापालिकेच्या उमेदवारीसाठी शब्द देऊ नका. नंतर अडचण होऊ शकते. मी एकाला, फडणवीस दुसऱ्याला, पालकमंत्री तिसऱ्याला तर आमदार चौथ्याला उमेदवारीसाठी शब्द देतील, असे होऊ नये. यातून चुकीचा संदेश जाईल. जेथे उमेदवारीबाबत मतभेद असतील तो प्रभाग तूर्तास बाजूला ठेवून पुढे जाऊ व नंतर चर्चेतून मार्ग काढू, असे त्यांनी सुचविले. फडणवीस म्हणाले, केंद्र व राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे विरोधक महापालिकेच्या निवडणुकीत एकसंघपणे भाजपला टार्गेट करतील. हे लक्षात घेऊन विजयासाठी काम करा. आपल्याला न मानणाऱ्या उमेदवाराला विरोध करू नका. आपले पीए, नातेवाईक उमेदवारांच्या यादीत घुसवू नका. सक्षम कार्यकर्त्यांना संधी द्या, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. बैठकीला खा. अजय संचेती, खा. डॉ. विकास महात्मे, शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे, सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, डॉ. मिलिंद माने, अनिल सोले. गिरीश व्यास या आमदारांसह महापौर प्रवीण दटके, सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, शहर महामंत्री संदीप जोशी, भोजराज डुंबे, संदीप जाधव, किशोर पलांदूरकर, विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, श्रीकांत देशपांडे, राजेश बागडी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

पक्षात थेट ‘एन्ट्री’ देऊ नका
इतर पक्षात दुखावलेले तसेच भाजपचे समर्थन वाढत असल्याचे पाहून अनेक लोक पक्षात येण्यास इच्छुक आहेत. मात्र, कुणालाही थेट पक्षात घेऊ नका. आधी खालच्या कार्यकर्त्याशी चर्चा करा. त्याने संमती दिली तरच निर्णय घ्या. बाहेरून लोक येतील, वरवर आनंद दिसेल व खाली मात्र खदखद वाढेल, असे चित्र तयार होणार नाही याची काळजी घ्या, असा सल्ला गडकरींनी उपस्थितांना दिला.
लोकमतच्या वृत्तावरही चर्चा
भाजपतर्फे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यात सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणात भाजपला मोठा धक्का बसणार असल्याची आकडेवारी समोर आली होती. ५ आॅक्टोबर रोजी लोकमतने हे सर्वेक्षण प्रकाशित केले होते. वाड्यावरील बैठकीत या संदर्भानेही चर्चा झाली. लोकमतने प्रकाशित केलेले सर्वेक्षण शतप्रतिशत खरे असून भाजपचे डोळे उघडणारे आहे, असे गडकरी म्हणाले. नगरसेवकांबाबत बऱ्याच तक्रारी आहेत. नगरसेवक प्रभागात फिरत नाही, यावर गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली.
८० जागा ‘अ’ श्रेणीत
गडकरी- फडणवीस यांच्या समक्ष प्रभागनिहाय प्रेझेंटेशन सादर करण्यात आले. नव्या प्रभाग रचनेत कोणत्या प्रभागात कोणत्या वस्त्यांचा समावेश करण्यात आला. कोणत्या भागात भाजपची अधिक मते आहेत. कोणत्या वस्तीत अधिक परिश्रम घ्यावे लागतील. नव्या रचनेचा कुठे फायदा तर कुठे तोटा आहे, कोणत्या प्रभागात किती जागा जिंकू शकतो, याचे प्रभागनिहाय विश्लेषण करण्यात आले. या वेळी ८० जागा ‘अ’ श्रेणीत म्हणजे जिंकण्याची शंभर टक्के खात्री असल्याचे सांगण्यात आले. तर ३५ जागा ‘ब’ मध्ये व उर्वरित जागा ‘क ’मध्ये असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: No tickets, tickets on surveillance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.