एनआयएवर विश्वास नाही, सीआयडीमार्फत व्हावा तपास : आनंदराज आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 10:32 PM2020-02-03T22:32:04+5:302020-02-03T22:33:54+5:30
कोरेगाव भीमा हल्ला प्रकरणात मनोहर भिडे व मिलिंद एकबोटे हेच खरे सूत्रधार असून त्यांना वाचवण्यासाठीच या हल्ल्याची चौकशी केंद्र सरकारने एनआयएकडे सोपवली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरेगाव भीमा हल्ला प्रकरणात मनोहर भिडे व मिलिंद एकबोटे हेच खरे सूत्रधार असून त्यांना वाचवण्यासाठीच या हल्ल्याची चौकशी केंद्र सरकारने एनआयएकडे सोपवली आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी राज्य सरकारने सीआयडीमार्फत करावी, त्यात केंद्र सरकारने हस्तक्षेप करू नये. तसेच या प्रकरणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केली.
आनंदराज आंबेडकर म्हणाले, कोरेगाव भीमा हल्ल्याचे मूख्य सूत्रधार मनोहर भिडे व मिलिंद एकबोटे आहेत. मागच्या भाजपच्या सरकारने त्या हल्ल्याला शहरी नक्षलवादाशी जोडून वेगळेच स्वरूप देण्याचा घाट घातला होता. सध्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारने या प्रकरणाची नव्याने चौकशी लावताच केंद्र सरकारने आरोपींना वाचवण्यासाठी एनआयएकडे तपास सोपवला.
आनंदराज आंबेडकर म्हणाले, देशातील अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. शासकीय कंपन्या विकल्या जात आहेत. आपल्या अपयशावर पांघरूण घालण्यासाठी सीएएसारखे नको असलेले कायदे लादले जात आहेत. देशात अघोषित आणीबाणी लादली गेली आहे. परंतु या देशातील तरुण लोकशाही व संविधानाच्या संरक्षणासाठी उभा झाला आहे, आम्ही या तरुणांसोबत आहोत. यावेळी त्यांनी राज्य सरकारवरही टीका केली. राज्यातील तीन वेगवेगळ्या विचारांचे पक्ष केवळ सत्तेसाठी एकत्र आले आहेत. त्यांचे विचारा अजूनही जुळले नसल्याने सरकारच्या कामालाही सुरूवात होऊ शकली नाही. पत्रपरिषदेला रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष सागर डबरासे, महासचिव कुमार कुरतडीकर उपस्थित होते.
आंबेडकरी चळवळीच्या स्वतंत्र राजकीय अस्तित्वासाठी बाहेर
राज्यात आंबेडकरी चळवळीचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व निर्माण करण्याच्या उद्देशाने रिपब्लिकन सेना कार्य करणार आहे. यासाठीच आपण वंचित बहुजन आघाडीमधून बाहेर पडलोय. परंतु संघटना मजबूत केल्याशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे अगोदर संघटना मजबूत करण्यावर आपला भर आहे. आपल्याला लोकांकडून मोठे समर्थन मिळत आहे. विविध आंबेडकरी संघटनांमधील कार्यकर्ते आमच्या पक्षात येत असल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले.