गणवेश का नाही; जाब विचारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 02:11 AM2017-07-18T02:11:32+5:302017-07-18T02:11:32+5:30

महापालिकेच्या शाळांतील ७० टक्के विद्यार्थ्यांचे बँकेत खाते उघडण्यात आले आहे. शाळा व्यवस्थापन समित्याकडे निधी पाठविण्यात आला असून ..

No uniform; Asking for answers | गणवेश का नाही; जाब विचारणार

गणवेश का नाही; जाब विचारणार

googlenewsNext

सभागृहात मुद्दा गाजणार : विभागाकडे गणवेश वाटपाचा डाटा उपलब्ध नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या शाळांतील ७० टक्के विद्यार्थ्यांचे बँकेत खाते उघडण्यात आले आहे. शाळा व्यवस्थापन समित्याकडे निधी पाठविण्यात आला असून गणवेश वाटप धडाक्यात सुरू असल्याचा दावा शिक्षण विभागाकडून केला जात आहे. परंतु प्रत्यक्षात किती शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. याचा डाटा सोमवारपर्यंत या विभागाकडे उपलब्ध नव्हता. त्यामुळे विभागाचा खोटारडेपणा उघडकीस आला आहे. गणवेश वाटपाचा दावा धादांत खोटा आहे. गरीब विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाही. यावर विरोधकांसोबतच सत्तापक्षाच्या नगरसेवकांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत सभागृहात गुरुवारी जाब विचारणार असल्याची माहिती सदस्यांनी दिली.
गरीब विद्यार्थ्यांना गणवेश न मिळण्याला महापालिका प्रशासनच जबाबदार व पदाधिकारी जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विद्यार्थ्याना गणवेश मिळण्यासाठी शिक्षण विभागाने व शिक्षण समितीने कोणत्याही स्वरूपाचे नियोजन केलेले नाही. शाळा सुरू होण्यापूर्वीच याबाबतचे नियोजन करण्याची गरज होती. दुर्दैवाने असे नियोजन करण्यात आले नाही. गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचाच हा प्रकार आहे. शिक्षण विभाग गरीब विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
शिक्षण समितीने पुढाकार घेऊ न माजी सभापतींचा सल्ला घेतला तरी हा विषय आठवडाभरात मार्गी लागू शकतो. परंतु विद्यार्थ्याना गणवेश मिळाला पाहिजे अशी भावना पदाधिकारी व अधिकाऱ्यांत नाही. त्यामुळे यावर तोडगा निघण्याची शक्यता नसल्याचे शिक्षकांनी सांगितले.

गणवेश वाटपाचा
डाटा उपलब्ध नाही
महापालिकेच्या किती शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले आहे. किती विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला, याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता शिक्षण विभागाकडे यासंदर्भात माहिती उपलब्ध नसल्याचे शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी सांगितले. शिक्षण विभागाकडे गणवेश वाटपाचा डाटा नसल्याने विभाग याबाबत गंभीर नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
सभापती अज्ञातवासात
महापालिकेतील विद्यार्थी गणवेशाविना आहे. परंतु शिक्षण सभापती दिलीप दिवे या संदर्भात गंभीर नाही. आजवर गणवेश वाटपाचा प्रश्न का उपस्थित झाला नाही. याची साधी चर्चा त्यांनी माजी पदाधिकाऱ्यांसोबत केलेली नाही. एवढेच नव्हे तर शिक्षण समितीच्या कक्षातही ते दिसत नाही. त्यामुळे शिक्षकांना गणवेश वाटपातील अडचणी मांडता येत नसल्याने सभापती अज्ञातवासात तर गेले नाही ना अशी शिक्षकांत चर्चा आहे.
पटसंख्येसाठी
शिक्षकांचा पुढाकार
४महापालिकेच्या काही शाळांची पटसंख्या कमी आहे. ती कमी झाली तर नोकरी धोक्यात येण्याची शक्यता आहे. याचा विचार करून काही शाळांतील शिक्षकांनी विद्यार्थ्याना गणवेश व अन्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. परंतु अशा मोजक्याच दोन-चार शाळा आहेत. अधिक पटसंख्या असलेल्या शाळांतील विद्यार्थ्याना गणवेश मिळालेला नाही. कधी मिळणार याची शाश्वती नाही.

Web Title: No uniform; Asking for answers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.