लसीकरण नाही तर वेतनही नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:09 AM2021-09-22T04:09:53+5:302021-09-22T04:09:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोविड प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस न घेणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवा, असे आदेश ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस न घेणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवा, असे आदेश प्रशासनाने सर्व विभाग प्रमुखांना दिले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांत प्रचंड खळबळ उडाली आहे.
दोन्ही डोस न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांत प्रामुख्याने मनपातील सफाई कर्मचारी व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या आदेशावर नाराजी व्यक्त करून राष्ट्रीय नागपूर कार्पोरेशन एम्प्लाईज असोसिएशनने हा आदेश तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे.
प्रशासनाने काढलेला आदेश तर्कहीन असल्याने तो मागे घ्यावा, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष सुरेंद टिंगणे यांनी आयुक्त राधाकृष्णन बी. यांना दिलेल्या पत्रातून केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने कोविड लसीकरण ऐच्छिक घोषित केले आहे. त्यामुळे डोस न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन रोखणे संयुक्तिक होणार नाही. या निणंयामुळे गरीब कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर परिणाम होणार असल्याने आदेश मागे घ्यावा, अन्यथा आंदोलन करू असा इशारा टिंगणे यांनी दिला आहे.