नळाला नाही पाणी घागर उतानी रे गोपाळा! नागपुरात २४ बाय ७ पाणीयोजना फक्त नावालाच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2022 11:38 AM2022-05-06T11:38:10+5:302022-05-06T12:06:28+5:30

नळाला पाणी नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. नगरसेवकांकडे पाण्याच्या मागणीसाठी नागरिकांची सकाळपासूनच गर्दी असते.

no water supply in half of nagpur, Wathoda area has been thirsty for the last four years | नळाला नाही पाणी घागर उतानी रे गोपाळा! नागपुरात २४ बाय ७ पाणीयोजना फक्त नावालाच..

नळाला नाही पाणी घागर उतानी रे गोपाळा! नागपुरात २४ बाय ७ पाणीयोजना फक्त नावालाच..

googlenewsNext
ठळक मुद्देगेल्या चार वर्षांपासून वाठोडा परिसर तहानलेलाच : पाण्याचा थेंबही नाही

प्रवीण खापरे

नागपूर : शहरात महानगरपालिकेच्या वतीने ओसीडब्ल्यूच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या २४ बाय ७ पाणीयोजनेचे धिंडवडे जर कुठे बघायचे असतील तर ते वाठोडा परिसरात बघता येतील. वाठोडा हा महानगरपालिकेच्या अखत्यारित येत असलेला परिसर आहे आणि येथील वस्त्यांमध्ये नळाच्या जोडण्या सात-आठ वर्षांपूर्वीपासून पोहोचल्या आहेत. मात्र, या जोडण्या केवळ नावालाच असून दिवसाला एक तास सोडल्या जाणाऱ्या पाण्याची धार करंगळीपेक्षाही बारीक असते. उन्हाळ्यात तर नळाला थेंबभरही पाणी नसते आणि कधी पोहोचलेच तर धड १५ मिनिटेही नसते.

शहराचा आउटस्कर्ट भाग

शहराच्या आउटस्कर्ट भागातील हा परिसर असून, येथून जवळच भांडेवाडी डम्पिंग यार्ड आहे आणि या डम्पिंगच्या समांतर परिसरात सिम्बॉयसिस विद्यापीठही आहे. ही एक मोठी लोकवस्ती असून येथे श्रीकृष्णनगर, गोपाळकृष्णनगर, संकल्पनगर, विद्यानगर, वाठोडागाव, रिंगरोडच्या पलीकडे स्वामिनारायण मंदिरमागील लोकवस्ती जसे श्रावणनगर, वैष्णोदेवीनगर, नागोबा मंदिर परिसर, मैत्री चौक, अनमोलनगर आदी वस्त्या येतात. या भागात वर्षाचे बाराही महिने वॉटर टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असतो. जवळपास प्रत्येकाच्या घरी नळकनेक्शन्स आहेत. मात्र, अनेकांच्या नळाला मीटर नाहीत. अनेकांना पाण्याचे बिलही येत नाही. याबाबत स्थानिक नगरसेवकांकडे तक्रार केली जाते. मात्र, नगरसेवकही महापालिकेच्या नेहरूनगर झोनकडे बोट दाखवून गप्प बसतात. नेहरूनगर झोनमध्ये विचारणा केली असता, प्रत्येक वेळी सुधारणेचे काम सुरू असल्याचे सांगितले जाते.

घरोघरी टँकर

नळाला पाणी नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. नगरसेवकांकडे पाण्याच्या मागणीसाठी नागरिकांची सकाळपासूनच गर्दी असते. उन्हाळा असल्याने पाण्याची मागणी प्रचंड असल्याने घरोघरी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. गल्लीबोळात टँकर शिरण्यासही प्रचंड अडचणी असतात.

लो प्रेशरमुळे पाणी पोहोचत नाही!

वाठोडा परिसरात नळाद्वारे पाण्याचा पुरवठा नंदनवन येथील पाण्याच्या टाकीवरून होतो. मात्र, नंदनवन ते वाठोडा हे अंतर फार लांब असल्याने आणि प्रेशर लो होत असल्याने नळाला पाणी येत नसल्याचे नेहरूनगर झोनमधील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. पाणीपुरवठ्यासाठीची व्यवस्था खरबी येथे शिफ्ट करण्याचा प्रस्ताव असून, त्याअनुषंगाने दुरुस्तीचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. काहीच दिवसांत ही समस्या सुटेल, असेही संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.

गोपाळकृष्णनगर-विद्यानगरातील नागरिक त्रस्त

गोपाळकृष्णनगर व विद्यानगरात दोन नगरसेवकांचे वास्तव्य आहे. महानगरपालिकेत महत्त्वाच्या समितीवर सभापती असलेला एक माजी नगरसेवक नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याची बोंब येथील नागरिकांनी गेली. नळाला पाणीच येत नाही आणि टँकरही बरोबर येत नसल्याने पिण्याच्या पाण्याचीही समस्या असल्याचे धनश्री गोसावी, साहिल गोसावी, अनिल हाडके, रेखा डांगे, योगेश जगताप, कोकिळा खरवडे, सचिन कदम, कौतुक शेंदरे, शुभम जगताप आदी नागरिकांनी सांगितले.

* चार वर्षांपूर्वी नळाला पाणी यायचे. त्यानंतर येणे बंद झाले. नळाला मीटर लावलेलेे नाही. मीटरसाठी तक्रार केली. परंतु, अजूनही आलेला नाही. टँकरशिवाय पर्याय नाही.

- विनोद नागोसे, श्रावणनगर

* टँकर आला नाही तर पाणीच मिळत नाही. पाण्याची समस्या मोठी आहे. नळ असूनही पाणीच येत नसल्याचे काहीच फायदा नाही. हिवाळ्यात कसेतरी पाणी येते. यंदा तर फेब्रुवारीपासूनच नळातून पाणी गायब झाले आहे.

- रश्मी तिवारी, वैष्णोदेवीनगर

* पिण्यासाठीसुद्धा टँकरचेच पाणी वापरावे लागत आहे. नगरसेवकाकडे गेलो तर पाण्याच्या टाकीवर जाऊन सांगा म्हटले जाते. टाकीवर जाऊन सांगितले तर चार दिवसांनी टँकर येतो, तोपर्यंत विनापाणी राहावे लागते.

- पूजा कुंभरे, मैत्री चौक

नळाला मीटर लावलेले नाही तरीही बिल येते, ही प्रक्रीया सर्व बेकायदेशीर नळ जोडणीला कायदेशिर स्वरूप देता यावे म्हणून महानगरपालिका व ओसीडब्ल्यूने चालविलेली ड्राईव्ह होती. त्याअनुषंगाने, आता सर्वांच्या नळाला लवकरच मीटर लागेल. शिवाय, यंदा अपेक्षेपेक्षा लवकर उन्हाळ्याचा प्रकोप जाणवायला लागल्याने ऐनकेन मार्गे पाण्याचा वापर वाढला आहे आणि पाण्याचे इतर परंपरागत स्त्रोत आटले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची विभागांनी होत असल्याने आणि घरोघरी टुल्लू पंपाने पाणी खेचले जात असल्याने पाण्याचा पुरवठा बाधित होत आहे. त्यातच वाठोडा हा महानगरपालिकेचा टेल एण्ड क्षेत्र असल्याने पाण्याच्या टाकीवरून निघणारे पाणी तेथेपर्यंत पोहोचण्यास उशीर होतो आणि दरम्यान टुल्लूपंपाद्वारे पाणी ओढले जात असल्याने पाणी पोहोचत नाही. लवकरच यावर तोडगा काढला जाईल आणि पाणी घरोघरी पोहोचेल. 

- सचिन द्रवेकर, जनसंपर्क अधिकारी, ओसीडब्ल्यू

Web Title: no water supply in half of nagpur, Wathoda area has been thirsty for the last four years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.