‘बिग-बी’ ची जागा कुणीही घेऊ शकत नाही : अभिषेक बच्चन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 08:26 PM2018-08-25T20:26:26+5:302018-08-25T20:32:28+5:30
बॉलिवुडचे ‘बिग-बी’ अमिताभ बच्चन यांची जागा कुणीही घेऊ शकत नाही. मीसुद्धा नाही. रिमेक अािण सिक्वेलच्या या काळात अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटात त्यांच्या भूमिका करणे अत्यंत कठीण आहे. कुणीही असा प्रयत्न करू नये. त्यांच्या कामाची स्टाईल सर्वात वेगळी असल्याचे अभिषेक बच्चन यांनी सांगितले. ‘मनमर्जिया’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नागपुरात आलेल्या चित्रपटातील कलाकारांसोबत अभिषेक बच्चन यांनी लोकमतशी संवाद साधला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बॉलिवुडचे ‘बिग-बी’ अमिताभ बच्चन यांची जागा कुणीही घेऊ शकत नाही. मीसुद्धा नाही. रिमेक अािण सिक्वेलच्या या काळात अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटात त्यांच्या भूमिका करणे अत्यंत कठीण आहे. कुणीही असा प्रयत्न करू नये. त्यांच्या कामाची स्टाईल सर्वात वेगळी असल्याचे अभिषेक बच्चन यांनी सांगितले.
‘मनमर्जिया’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नागपुरात आलेल्या चित्रपटातील कलाकारांसोबत अभिषेक बच्चन यांनी लोकमतशी संवाद साधला.
दोन वर्षांच्या कालावधीनंतर ‘मनमर्जिया’ चित्रपटातून कमबॅक करण्याच्या प्रश्नावर ज्युनिअर बच्चन यांनी सांगितले की, जे काम करायचे, ते चांगले आणि मनपासून केले पाहिजे. प्रेक्षकांना आमचे काम पसंत आले पाहिजे. ‘मनमर्जिया’ची कथा चांगली वाटली म्हणून हा चित्रपट केला. एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, अनुराग कश्यप नव्हे तर आनंद एल राय चित्रपट घेऊन माझ्याकडे आले होते. दिग्दर्शनासाठी अनुराग बेस्ट चॉईस आहे. चित्रपटात तीन एकदम वेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर आहेत.
चित्रपटात वेगवेगळ्या भूमिकेवर तापसी पन्नू म्हणाली, हे चांगले आहे की मला वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट मिळत आहेत. हॉरर ते कॉमेडी आणि गंभीर चित्रपटात अभिनय करण्याची संधी मिळत आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या मुल्क चित्रपटाचे क्रिटिक आणि सर्वसामान्य प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांवर तापसी म्हणाली, पुरस्कार मिळावा या उद्देशाने चित्रपट करीत नाही. चित्रपटाचे बॉक्स आॅफिसवर होणारे कलेक्शन महत्त्वाचे आहे. प्रेक्षक पैसे खर्च करून सिनेमागृहात चित्रपट पाहण्यासाठी येतात. त्यांचे मनोरंजन झाले पाहिजे. चित्रपटाला बॉक्स आॅफिसवर मिळणारे यश हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. हिंदी, तमिल, तेलगू, मल्यालम भाषेतील चित्रपट एकाचवेळी कसे करता, या प्रश्नावर तापसी म्हणाली, बॉलीवुडमध्ये सक्रिय झाल्यानंतरही वर्षातून किमान एक चित्रपट दक्षिण भारतीय केला पाहिजे, असा उद्देश आहे. गेल्या शुक्रवारी तिचा एक तेलगू चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
एखादा मराठी चित्रपट करणार काय या प्रश्नावर ती म्हणाली, जोपर्यंत मराठी भाषा चांगल्या प्रकारे बोलता येणार नाही, तोपर्यंत मराठी चित्रपट करणे शक्य नाही. तर मग तेलगू, तामिळ बोलता येते का, यावर तिने तेलगू बोलता येते, असे सांगितले. तामिळसुद्धा थोडेफार बोलता येते. लवकर लवकर तिचे चित्रपट प्रदर्शित होत आहेत, यावर ज्युनिअर बच्चन म्हणाले, ऋृतू कमी येतात, पण तापसीचे चित्रपट जास्त प्रदर्शित होतात.
वैयक्तिक कारणामुळे ‘पलटन’ चित्रपट केला नाही
अभिषेक बच्चन म्हणाले, वैयक्तिक कारणांमुळे ‘पलटन’ चित्रपट करता आला नाही. जेपी दत्ता यांच्या या चित्रपटात काम करण्याची इच्छा होती. पण वैयक्तिक कारणांमुळे चित्रपट करणे शक्य झाले नाही. जेपी दत्ता माझ्या परिवाराचा हिस्सा आहे. मला इंडस्ट्रीमध्ये त्यांनी लॉन्च केले आहे. १० वर्षांनंतर ते चित्रपट तयार करीत आहे. त्यांची मुलगी निधी निर्मिती करीत आहे. दत्ता हे वडिलांसारखे आहेत. त्यांच्याकडून बरेच काही शिकलो आहे.
प्रशंसा बरी वाटते
संजू चित्रपटातून चर्चेत आलेले विक्की कौशल्य म्हणाला, संजू चित्रपटाची प्रत्येकाकडून प्रशंसा ऐकून बरे वाटते. दिग्दर्शक, निर्माते जेव्हा चांगल्या अभिनयाची प्रशंसा करतात तेव्हा आयुष्यात त्यापेक्षा दुसरी गोष्ट कोणतीच असू शकत नाही. संजूच्या यशानंतर अनेक चित्रपटांच्या आॅफर येत आहेत.
बिग-बी आणि ज्युनियर बच्चन यांच्यात थोडासा फरक
सिनीअर बच्चन आणि ज्युनियर बच्चन यांच्यासोबत काम करण्याच्या अनुभवावर तापसी म्हणाली, दोघांमध्ये थोडासा फरक आहे. त्याचवेळी ज्युनिअर बच्चन म्हणाले, माझी दाढी काळी तर त्यांची पांढरी आहे. तेव्हा तापसी म्हणाले, अनेकदा आवाज आणि अंदाज दोघांचेही सारखेच वाटतात. दोघांमध्ये फारसे अंतर नाही.
फुटबॉल, कबड्डी आणि कॅमेरा यांच्यात कॅमेऱ्याचे जास्त आकर्षण
फुटबॉल, कबड्डी आणि कॅमेरा यांच्यात कोणत्या गोष्टीचे आकर्षण आहे या प्रश्नावर ज्युनिअर बच्चन म्हणाले, कॅमेऱ्याचे सर्वाधिक आकर्षण आहे. प्रत्येक अभिनेत्यासाठी हे महत्त्वाचे आहे.
मल्टीस्टार व सोलो चित्रपटाचा विचार करीत नाही
चित्रपटात काम करताना मल्टीस्टार वा सोलो चित्रपटाच्या बाबतीत विचार करीत नाही. चित्रपटात भूमिका दमदार असावी. भूमिका पाच मिनिटे असो वा दहा मिनिटे त्याचाही विचार करीत नाही. तसे पाहता प्रत्येक चित्रपटात अनेक कलाकार असतात. गुरू चित्रपटात माझ्यासोबत मिथुनदा, विद्या बालन, माधवन यांच्यासारखे दिग्गज कलाकार होते, असे अभिषेक बच्चन म्हणाले.
‘एफर्टलेस’ कलाकार
विक्की कौशलची प्रशंसा करताना अभिषेक बच्चन म्हणाले, विक्की आणि तापसी ‘एफर्टलेस’ कलाकार आहेत. भूमिकेत ते पूर्णपणे फिट होतात. आलिया वा जान्हवी यांच्यापैकी कोणत्या अभिनेत्रीसोबत आॅनक्रीन रोमान्स करण्याची इच्छा आहे. यावर विक्की म्हणाला, आलिसासोबत आॅनस्क्रीन रोमान्स केला आहे. या बाबतीत निर्माते वा दिग्दर्शकासोबत काही बोलता येईल, अशी स्थिती आता माझी नाही.