कुणालाही माफ करणार नाही
By admin | Published: July 12, 2017 02:55 AM2017-07-12T02:55:48+5:302017-07-12T02:55:48+5:30
अमरनाथ यात्रेकरूंवर झालेला हल्ला हे देशालाच आव्हान आहे. या हल्ल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीरतेने घेतले आहे.
गृहराज्यमंत्री हंसराज अहिर : अमरनाथ यात्रेकरूंवर झालेला हल्ला हे देशाला आव्हान
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अमरनाथ यात्रेकरूंवर झालेला हल्ला हे देशालाच आव्हान आहे. या हल्ल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीरतेने घेतले आहे. आम्ही कुणालाही माफ करणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी मंगळवारी केले. अमरनाथ हल्ल्याबाबत नागपूर विमानतळावर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अमरनाथ यात्रेवर झालेल्या या हल्ल्याचा अंदाज लावणे कठीण होते. अनेक दिवसांपासून अमरनाथ यात्रा सुरू असून, सुरक्षा यंत्रणांमुळे दहशतवाद्यांना कारवाई करता आली नाही. अमरनाथ यात्रा सुरळीत सुरू होती. पोलीस, सीआरपीएफ यांनी सर्व सुरक्षा व्यवस्था चोख उभारली होती. हा हल्ला का झाला, याची चिंता आहेच. परंतु हल्ल्यानंतर आता तेथील सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे. या हल्ल्याची आम्ही निंदा करतो. नि:शस्त्र लोकांवर हल्ला ही बहादुरी नाही. महिला, मुलांवर झालेला हल्ला भ्याडपणा आहे. हे आमच्यासाठी आव्हान आहे, असे अहिर म्हणाले.
गृहमंत्री राजनाथ सिंह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करीत आहेत. यापुढे असे होऊ नये यासाठी सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. हल्ल्याच्या मागे कुठली दहशतवादी संघटना आहे, याला आम्ही महत्त्व देत नाही.
सत्य समोर येईलच. मात्र कुठलीही संघटना ही शेवटी दहशतवादीच आहे. आम्ही कुणालाही माफ करणार नाही, असे अहिर यांनी स्पष्ट केले.