जिंकण्याच्या निकषावर उमेदवारी; चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले स्पष्ट
By कमलेश वानखेडे | Published: March 23, 2024 02:17 PM2024-03-23T14:17:06+5:302024-03-23T14:17:44+5:30
रामटेक शिवसेनेकडे तर अमरावती भाजप लढणार
कमलेश वानखेडे, नागपूर : रामटेक गेल्या १० वर्षांपासून शिवसेनेकडे आहे. ही जागा शिवसेना लढेल. तसेच अमरावतीची जागा भाजपकडे आहे. ही जागा १०० टक्के भाजपच्या चिन्हावर लढू. लवकरच येथे भाजपचा उमेदवार जाहीर होईल, जिंकण्याच्या निकषावर उमेदवार निश्चित करण्यात येत आहे, असे भाजपचे प्रदेश अध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
बावनकुळे म्हणाले, आज भाजपची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आहे. ज्या पाच जागा भाजपकडे आहेत त्यावर चर्चा होईल. महायुतीच्या काही जागा थांबल्या आहेत, त्यावर निर्णय होईल. सहा ते सात जागांवर चर्चा सुरू आहे. त्यावर दोन दिवसात निर्णय होईल. उदयन राजे यांची सातारा ची मागणी आहे. त्यावर महायुतीचे नेते निर्णय घेतील. खासदार म्हणून त्यांची काही कामे आहेत आणि भेटीगाठी आहे. त्यांच्या मागणीवर महायुतीत चर्चा होईल आणि निर्णय होईल. दक्षिण मुंबई बाबत मुख्यमंत्री शिंदे निर्णय घेतील. संभाजीनगर बाबत तिढा नाही, चर्चा सुरू आहे. रक्षा खडसे या सिटिंग खासदार आहेत, त्यांनी १० वर्षे चांगले काम केले आहे. १३ पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढतोय. ५१ टक्के मते घेऊन निवडणूक जिंकणार. मनसे किंवा इतरांमुळे उमेदवार जाहीर करण्यास वेळ होत नाही, असा दावाही त्यांनी केला.
अडसूळ व बच्चू कडू सोबत राहतील
- काही मतभेद होत असतात, बच्चू कडू किंवा अडसूळ यांचे मतभेद झाले असतील. मात्र देशात मोदी प्रधानमंत्री व्हावे यासाठी बच्चू कडू, अडसूळ सगळे प्रयत्न करतील, बच्चू कडू सोबत राहतील. महाराष्ट्रात ४५ प्लस जागा येतील, असा दावा बावनकुळे यांनी केला.