आजपासून ‘नॉमिनेशन’ प्रक्रिया; प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 10:00 AM2019-03-18T10:00:45+5:302019-03-18T10:02:41+5:30

रामटेक व नागपूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची तयारी जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली असून सोमवार १८ मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयात नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे.

'Nomination' process from today; Admin ready | आजपासून ‘नॉमिनेशन’ प्रक्रिया; प्रशासन सज्ज

आजपासून ‘नॉमिनेशन’ प्रक्रिया; प्रशासन सज्ज

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रामटेक व नागपूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची तयारी जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली असून सोमवार १८ मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयात नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी रविवारी निवडणूक कामाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी मुदगल यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध सूचना केल्या. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हे नामनिर्देशनपत्रे २५ मार्च २०१९ पर्यंत (सार्वजनिक सुटीव्यतिरीक्त)सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत स्वीकारली जाणार आहेत. उमेदवारांना नामनिर्देशन पत्र विहीत नमुना २ अ मध्ये सादर करणे आवश्यक आहे. उमेदवार मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे असल्यास एक प्रस्तावक आवश्यक आहे. सदर प्रस्तावक हा संबंधित लोकसभा मतदारसंघाचा मतदार असावा. स्वतंत्र व मान्यताप्राप्त नसलेल्या पक्षाचा उमेदवार असल्यास त्यांना १० प्रस्तावक असणे आवश्यक आहे. व तो नामनिर्देशनपत्र ज्या लोकसभा मतदारसंघातून भरणार आहे त्या लोकसभा मतदारसंघातील मतदार असणे आवश्यक आहे.
नामनिर्देशन पत्रासोबत निवडणूक आयोगाचे आदेशानुसार विहीत प्रपत्रातील प्रपत्र २६ (भाग-अ, भाग-ब आणि सत्यापन)चे शपथपत्र शपथआयुक्त किंवा प्रथमश्रेणी दंडाधिकारी किंवा लेख प्रमाणक यांच्यासमोर शपथबद्ध करणे आवश्यक आहे. शपथपत्रातील सर्व रकाने भरणे आवश्यक असून, कोणताही रकाना रिक्त ठेवू नये. कोणत्याही बाबींच्या संबंधात कोणताही रकाना न लिहिता रिक्त ठेवू नये. निरंक (Nil) किंवा लागू नाही (Not Applicable)) किंवा माहीत नाही (Not Known) असे त्या रकान्यामध्ये नमूद करावे. भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार शपथपत्रात भाग ‘अ’ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी ई-मेल आयडी, संपर्क दूरध्वनी क्रमांक, समाजमाध्यम खाते असल्यास नमूद करणे आवश्यक आहे. ज्या लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवावयाची आहे, त्या मतदारसंघात उमेदवारांचे नाव नसल्यास ज्या मतदारसंघातील मतदार यादीत उमेदवाराचे नाव आहे, त्या मतदारसंघातील मतदार यादीची प्रमाणित प्रत नामनिर्देशन पत्रासोबत सादर करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय पक्ष, राज्यस्तरीय पक्ष, मान्यता प्राप्त पक्षाचा उमेदवार असल्यास अ व ब फॉर्म नामनिर्देशन पत्रासोबत किंवा नामनिर्देशन पत्र सादर करावयाच्या अंतिम दिनांकास दुपारी ३ वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक आहे.
मतदारसंघ राखीव असल्यास नामनिर्देशन पत्रासोबत सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. अमानत रक्कम सर्वसाधारण उमेदवारांसाठी २५ हजार व अनुसूचित जाती - जमातीसाठी १२ हजार ५०० रुपयेप्रमाणे आवश्यक आहे. अनामत रक्कम रोख किंवा रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया, शासकीय कोषागार येथे चालानद्वारे भरावी, धनादेश स्वीकारले जाणार नाही.
नामनिर्देशन पत्रासोबत रोख रक्कमेची पावती, चालान सादर करणे आवश्यक आहे. निवडणूक खर्चाचे नियंत्रण सुलभ व्हावे, म्हणून उमेदवाराने नामनिर्देशन पत्र सादर करावयाच्या किमान एक दिवस अगोदर बँकेत स्वत:चे नावे व फक्त निवडणूक खर्चासाठी खाते उघडणे आवश्यक आहे व सदर खाते क्रमांकाची माहिती नामनिर्देशन पत्रासोबत लेखी स्वरुपात निवडणूक निर्णय अधिकारी यांना देणे आवश्यक आहे. सोमवार २५ मार्च रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रे स्वीकारली जातील. यावेळी उप जिल्हानिवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा व इतर वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

एक उमेदवार जास्तीत जास्त चार अर्ज भरू शकतो
एक व्यक्ती जास्तीत-जास्त चार नामनिर्देशन पत्रे सादर करु शकते. तसेच एक व्यक्ती जास्तीत जास्त दोन लोकसभा मतदार संघातून नामनिर्देशन पत्र सादर करु शकते. नामनिर्देशन पत्र सादर करताना उमेदवार व इतर जास्तीत - जास्त चार व्यक्ती असे एकूण जास्तीत-जास्त पाच व्यक्ती निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कक्षात हजर राहू शकतात. नामनिर्देशन पत्र सादर करण्यासाठी येणाऱ्या व्यक्ती कमाल तीन वाहनांच्या मर्यादेस अधीन राहून निवडणूक निर्णय अधिकारी यांचे परिसरात वाहने आणू शकतात. 

असा आहे कार्यक्रम
सोमवार - १८ मार्च : नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यास सुरुवात
सोमवार - २५ मार्च : नामनिर्देशनपत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक
मंगळवार - २६ मार्च : नामनिर्देशन पत्राची छाननी
गुरुवार २८ मार्च : उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक
गुरुवार ११ एप्रिल : मतदान
गुरुवार २३ मे : मतमोजणी

Web Title: 'Nomination' process from today; Admin ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.