विना अनुदानित शिक्षकांचा मोर्चा दुसऱ्या दिवशीही सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 09:43 PM2018-07-11T21:43:13+5:302018-07-11T21:44:22+5:30
विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य (कायम) विना अनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने विधानभवनावर काढलेला मोर्चा आपल्या मागण्यांसाठी अडला होता. मंगळवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या आश्वासनावर समाधान न झाल्यामुळे मोर्चेकरी ठाण मांडून बसले होते. रात्रभर मुक्कामी थांबलेला हा मोर्चा बुधवारीही अडून होता. मोर्चाची मुदत संपल्यामुळे मोर्चा मागे घेण्याची सूचना पोलिसांनी बुधवारी सायंकाळी केली. परंतु शिक्षणमंत्री विधानसभेत घोषणा करीत नाहीत, तोवर मोर्चा मागे घेणार नसल्याची भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतल्यामुळे, हा मोर्चा सलग दुसऱ्या दिवशी रात्री उशिरापर्यंत तळ ठोकून होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य (कायम) विना अनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने विधानभवनावर काढलेला मोर्चा आपल्या मागण्यांसाठी अडला होता. मंगळवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या आश्वासनावर समाधान न झाल्यामुळे मोर्चेकरी ठाण मांडून बसले होते. रात्रभर मुक्कामी थांबलेला हा मोर्चा बुधवारीही अडून होता. मोर्चाची मुदत संपल्यामुळे मोर्चा मागे घेण्याची सूचना पोलिसांनी बुधवारी सायंकाळी केली. परंतु शिक्षणमंत्री विधानसभेत घोषणा करीत नाहीत, तोवर मोर्चा मागे घेणार नसल्याची भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतल्यामुळे, हा मोर्चा सलग दुसऱ्या दिवशी रात्री उशिरापर्यंत तळ ठोकून होता.
२० टक्के अनुदान प्राप्त झालेल्या सर्व शाळांना प्रचलित नियमानुसार १०० टक्के अनुदान द्यावे, यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य (कायम) विना अनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने मंगळवारी विधानभवनावर मोर्चा काढला होता. मोर्चातील शिष्टमंडळाने शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली. शिक्षणमंत्र्यांनी मागण्यांवर विचार करण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले. परंतु जोपर्यंत शिक्षण मंत्री विधानसभेत याबाबत घोषणा करीत नाहीत तोपर्यंत मोर्चा मागे घेणार नसल्याचा पवित्रा मोर्चेकऱ्यांनी घेतल्यामुळे, मंगळवारी रात्रभर मोर्चेकरी मॉरिस टी-पॉर्इंटवर तळ ठोकून बसले होते. बुधवारी दिवसभर हा मोर्चा तेथेच ठाण मांडून बसला होता. दरम्यान, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चात सहभागी शिक्षकांसाठी भोजनाची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मोर्चास्थळी केली होती. बुधवारी सायंकाळी पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना मुदत संपल्यामुळे मोर्चा मागे घेण्यास सांगितले. परंतु मागण्या मान्य होईपर्यंत मोर्चा मागे घेणार नसल्याची भूमिका घेऊन मोर्चेकरी बुधवारी रात्री उशिरापर्यंत जागेवरच ठाण मांडून बसले होते.