माजी मंत्री रणजित देशमुख यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरन्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 10:01 PM2018-09-14T22:01:41+5:302018-09-14T22:03:33+5:30
विशेष प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालयाने धनादेश अनादर प्रकरणामध्ये माजी मंत्री रणजित देशमुख व इतर तिघांविरुद्ध अजामीनपात्र वॉरन्ट बजावला आहे. अन्य आरोपींमध्ये पल्लवी पारीख, भावीन पारीख व अमित धुपे यांचा समावेश आहे. हे चौघेही परसेप्ट वेब सोल्युशन कंपनीचे संचालक आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विशेष प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालयाने धनादेश अनादर प्रकरणामध्ये माजी मंत्री रणजित देशमुख व इतर तिघांविरुद्ध अजामीनपात्र वॉरन्ट बजावला आहे. अन्य आरोपींमध्ये पल्लवी पारीख, भावीन पारीख व अमित धुपे यांचा समावेश आहे. हे चौघेही परसेप्ट वेब सोल्युशन कंपनीचे संचालक आहेत.
अजामीनपात्र वॉरन्ट बजावण्यात आल्यानंतर देशमुख यांचे वकिलाने या प्रकरणातील कारवाईविरुद्ध सत्र न्यायालयात अर्ज प्रलंबित असल्याची माहिती जेएमएफसी न्यायालयाला दिली. तसेच, अजामीनपात्र वॉरन्टवर स्थगिती देण्याची विनंती केली. ही बाब लक्षात घेता जेएमएफसी न्यायालयाने देशमुख यांच्याविरुद्धच्या वॉरन्टवर १९ सप्टेंबरपर्यंत स्थगिती दिली. त्यामुळे देशमुख यांना तात्पुरता दिलासा मिळाला. इतर आरोपींविरुद्ध मात्र पुढील कारवाई सुरू झाली आहे. जेएमएफसी न्यायालयाने सुरुवातीला चारही आरोपींना समन्स बजावला होता. समन्स तामील होऊनही ते न्यायालयात हजर झाले नाही. त्यानंतर न्यायालयाने जामीनपात्र वॉरन्ट बजावला. त्यालाही आरोपी जुमानले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने अजामीनपात्र वॉरन्ट बजावला आहे.
अतुल देवगडे यांनी आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तक्रारीतील माहितीनुसार, परसेप्ट वेब सोल्युशन कंपनीने देवगडे यांच्याकडून ११ लाख रुपयांची संगणक सामग्री खरेदी केली होती. कंपनीने ही रक्कम अदा करण्यासाठी देवगडे यांना पाच धनादेश दिले. ते सर्व धनादेश कंपनीच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे वठले नाहीत. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया करूनही काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे देवगडे यांनी न्यायालयात धाव घेतली. देवगडे यांच्या वतीने अॅड. इब्राहीम बक्ष तर, देशमुख यांच्या वतीने अॅड. अतुल नबिरा यांनी बाजू मांडली.