अपारंपरिक ऊर्जा निर्मिती हे देशाचे मिशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 11:41 PM2018-04-09T23:41:17+5:302018-04-09T23:41:33+5:30
अपारंपरिक ऊर्जा निर्मिती हे देशाचे मिशन असून आगामी ५ वर्षात १० हजार मेगावॉट सौर ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य आहे, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अपारंपरिक ऊर्जा निर्मिती हे देशाचे मिशन असून आगामी ५ वर्षात १० हजार मेगावॉट सौर ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य आहे, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी केले.
नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट जामठा येथे अपारंपरिक ऊर्जा निर्मितीच्या ७९० किलोवॅट प्रकल्पाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी प्रामुख्याने राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेष जोगळेकर, आर्किटेक्ट अशोक मोखा, डॉ. आनंद पाठक, आनंद औरंगाबादकर, कर्नल शर्मा उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले, रुफटॉप सोलरमध्ये ७९० किलोवॅटचा प्रकल्प नियोजित वेळेत उभे करणारे हे हॉस्पिटल पहिले आहे. हे हॉस्पिटल मुख्यमंत्र्यांचे मिशन आहे आणि त्या माध्यमातून सौर ऊर्जेला गतिमान करण्याचा हा प्रयत्न आहे. या प्रकल्पातून ३५०० युनिट वीज दररोज निर्मिती होणार आहे. ३ कोटी ३७ लाख ५७ हजार रुपयांच्या या प्रकल्पाला केंद्र्र शासनाने ९१ लाख ५० हजार रुपये अनुदान दिले आहे. सौर ऊर्जेसोबत या हॉस्पिटलची इमारतही ग्रीन बिल्डिंग व्हावी असे आपल्याला वाटत असून त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. या हॉस्पिटलशेजारीच एक ३३ केव्ही अत्याधुनिक उपकेंद्र्र उभारले जाणार आहे. ते देशातील पहिले अत्याधुनिक उपकेंद्र असेल. त्यासाठी ७ कोटी रुपये खर्च करणार आहोत. यामुळे येथील वीज कधीही खंडित होणार नाही, असेही ऊर्जामंत्री म्हणाले.
प्रास्ताविक हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेष जोगळेकर यांनी केले तर कर्नल शर्मा यांनी आभार मानले.
बॉक्स...
सौर ऊर्जा ही काळाची गरज :
गृहराज्यमंत्री रणजित पाटील
सौर ऊर्जा ही काळाची गरज असून आता घरोघरी सौर ऊर्जा निर्मिती सुरु झाली तर नवल वाटणार नाही अशी स्थिती येत असल्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील म्हणाले. सौर ऊर्जा निर्मितीमुळे पारंपरिक विजबिलासाठ़ी येणाऱ्या खर्चात बचत होईल व तो खर्च रुग्णांसाठी वापरला जाईल. आगामी काळात प्रत्येक घरावर सौर वीज निर्मितीचे पॅनेल दिसतील असे काम या क्षेत्रात आता सुरु झाले असल्याचे ते म्हणाले.