नागपूर विभागात अनिवासी भारतीयांनी भरला ७.१८ कोटींचा आयकर!
By मोरेश्वर मानापुरे | Published: April 14, 2024 08:17 PM2024-04-14T20:17:23+5:302024-04-14T20:17:30+5:30
६९६ आयकरदाते : पाच वर्षांत आयकर प्राप्त
नागपूर : नागपूर आयकर विभागांतर्गत गेल्या पाच वर्षांत ६९६ अनिवासी भारतीयांनी छाननी मूल्यांकनानंतर एकूण ७,१७,६८,५९३ रुपयांचा आयकर भरल्याची माहिती आहे. पण किती अनिवासी भारतीयांनी आयकर भरला नाही आणि त्यांच्याकडे किती आयकर थकित आहे, याची माहिती आयकर विभागाकडे उपलब्ध नाही. आयकरदात्यांनी आर्थिक वर्ष २०१९ ते २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत आयकर भरला आहे.
आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपूर प्रधान मुख्य आयकर आयुक्त विभागांतर्गत कार्यरत सेमीनरी हिल्स येथील आंतरराष्ट्रीय कर आकारणी विभागाकडे माहितीच्या अधिकारांतर्गत अर्ज केला होता. या अंतर्गत गेल्या पाच वर्षांत ६९६ अनिवासी भारतीयांनी आयकर भरल्याची माहिती नागपूर विभागाकडे आहे. मात्र थकित आकडेवारी आणि आयकरदात्यांच्या संख्येची माहिती विभागाकडे उपलब्ध नसल्याचे कोलारकर यांना सांगण्यात आले. एकूण ६९६ अनिवासी भारतीयांनी आयकर भरला, पण आयकर भरल्याची वर्षानुसार करदात्यांची माहिती विभागाकडे उपलब्ध नसल्याचे आयकर अधिकारी आणि केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकारी आर.व्ही. पाटील यांनी सांगितले. याची प्रत पाटील यांनी पुणे येथील आंतरराष्ट्रीय कर आकारणी विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांना पाठविली आहे.
छाननी मूल्यांकनानंतर आयकर प्राप्त
आर्थिक वर्ष आयकराची रक्कम (रुपयात)
२०१९-२० ६५,१६,९१५
२०२०-२१ २,६१,७७,२८५
२०२१-२२ ३,५७,४६,०८९
२०२२-२३ ३०,०९,१३०
२०१३ ते ३,१९,१७४
२९ फेब्रु.२४
एकूण कर ७,१७,६८५९३