एलबीटी न भरणाऱ्या ४ हजारांवर व्यापाऱ्यांची बँक खाती बंद; उद्योजक व बिल्डर्सचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 05:48 PM2023-01-23T17:48:22+5:302023-01-23T17:49:54+5:30
मनपाच्या नोटिसींना उत्तर न देणे भोवले
नागपूर : एलबीटी भरण्यासंदर्भात महापालिकेने पाठविलेल्या नोटिसीला उत्तर न देणाऱ्या ४,१४५ व्यापाऱ्यांची बँक खाती बंद करण्यात आली. यात व्यापारी, उद्योजक व बिल्डर्सचा समावेश आहे.
स्थानिक संस्था कर म्हणजेच एलबीटी भरणाऱ्या व्यापाऱ्यांची नोंद मनपाकडे असून जुलैनंतर त्यांनी एलबीटी विभागाकडे आपले विवरणपत्र सादर करणे बंधनकारक होते. विवरणपत्रामुळे व्यापाऱ्यांनी केलेली खरेदी आणि भरलेला एलबीटी या विषयी मनपाला माहिती उपलब्ध झाली असती, परंतु विवरणपत्र सादर न केल्यामुळे दंडात्मक कारवाई का करू नये? अशा आशयाची नोटीस महापालिकेने व्यापाऱ्यांना बजावली होती. नोटीस मिळताच काही व्यापाऱ्यांनी विवरणपत्रे व आपल्याकडील कागदपत्रे सादर केली. ४,१४५ व्यापाऱ्यांनी विवरणपत्र न भरल्यामुळे दंड भरण्याबाबतची नोटीस देण्यात आली. त्यानंतरही दंड भरण्यास न आलेल्या तसेच विवरणपत्रे सादर न केलेल्या व्यापाऱ्यांची खाती सील करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. या व्यापाऱ्यांची यादी तयार करून बँकांना खाते सील करण्याचे आदेश दिले.
- ४० कोटी ३६ लाख रुपयांचा महसूल प्राप्त
विवरणपत्र सादर न करणाऱ्यांना यापूर्वीच ५ हजार रुपये दंड भरण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली होती. त्यावर प्रतिसाद न देणाऱ्या व्यापाऱ्यांचे खाते बंद करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला. एलबीटी कायद्यातील तरतुदीनुसार बँकांनी तातडीने खाती बंद केली. यातून महापालिकेला ४० कोटी ३६ लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला असल्याची माहिती मनपाच्या एलबीटी विभागातर्फे देण्यात आली.