अविरत समाजसेवेचा ध्यास; उमेशबाबू चौबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 10:45 AM2018-08-09T10:45:07+5:302018-08-09T10:50:01+5:30

पीडित, वंचित, उपेक्षितांसाठी अवघे आयुष्य वेचणाऱ्या उमेशबाबूंना नागपुरात सगळेच आदराने बाबूजी म्हणतात.

non-stop social service; Umeshbabu Choubey | अविरत समाजसेवेचा ध्यास; उमेशबाबू चौबे

अविरत समाजसेवेचा ध्यास; उमेशबाबू चौबे

Next
ठळक मुद्देपीडित, वंचित, उपेक्षितांसाठी वाहिले अवघे आयुष्य

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: उत्तर प्रदेशातील यमुना किनारी असलेल्या होलीपुरा गावातून एक किशोरवयीन मुलगा नागपूरला निघाला होता. पुढच्या शिक्षणासाठी. वाटेत एका स्टेशनवर गाडी थांबली तेव्हा पाणपोईवर वो हिंदू का पाणी, वो मुसलमान का पाणी असे शब्द त्याने ऐकले आणि ते शब्द त्याच्या कानामनावर आदळत राहिले एखाद्या ज्वालारसाप्रमाणे. देवाने पाण्याची निर्मिती करताना कुठलाच भेदभाव केला नाही, मग माणसं हा भेद का जपताहेत? नाही... हे चित्र बदलले पाहिजे, असा ध्यास त्याने चालत्या गाडीतच घेतला आणि नागपुरात पाय ठेवल्यावर त्याच दिशेने चालण्याचा संकल्पही केला आणि जीवनाच्या शेवटपर्यंत तो पाळला. तो मुलगा म्हणजे ज्येष्ठ समाजसेवी उमेशबाबू चौबे होत.

काय आहे घटना ?
स्वातंत्र्यपूर्व काळापासून नागपुरात झालेल्या ऐतिहासिक चळवळीचे प्रत्यक्षदर्शी, बदलत्या नागपूरला अनुभवणारे एक सुजाण पत्रकार आणि समाजसेवेचा आयुष्यभर वसा जपलेले एक ज्येष्ठ समाजसेवी, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष उमेशबाबू चौबे यांचे बुधवारी रात्री ११.३० वाजता अल्प आजाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. 
 

खरी ओळख एका नि:स्वार्थ समाजसेवकाची

पीडित, वंचित, उपेक्षितांसाठी अवघे आयुष्य वेचणाऱ्या उमेशबाबूंना नागपुरात सगळेच आदराने बाबूजी म्हणतात. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राम मनोहर लोहिया यांना आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष पाहिलेले व त्यांच्या विचारांना आपला आदर्श मानणारे बाबूजी अवघे आयुष्य एखाद्या अवलियासारखेच जगले. पत्रकार, छायाचित्रकार, समाजसेवक, नाटककार, राजकारणी अशा विविध भूमिकांमध्ये नागपूरवासीयांनी बाबूजींना पाहिले असले तरी त्यांची खरी ओळख एका नि:स्वार्थ समाजसेवकाची आहे. आॅटोचालक, रिक्षाचालक, रेल्वे हमाल, फुटपाथ दुकानदार, माथाडी कामगार, मिल मजूर यांच्या हक्कासाठी वेळोवेळी आंदोलनाची मूठ बांधून त्या आंदोलनाच्या बळावर अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचे कार्य उमेशबाबूंनी केले. त्यासाठी प्रसंगी घरावर तुळशीपत्र ठेवले. केवळ कष्टकरी मजुरांसाठीच संघटना बांधून ते थांबले नाहीत तर विदर्भातील कलावंतांना सन्मानाने व्यासपीठ मिळावे, यासाठी ३० वर्षाआधी त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन कलासागर या संस्थेची स्थापना केली. तत्कालीन नागपूर विद्यापीठात अधिकृत विद्यार्थी संघटनेचे पहिले अध्यक्ष बनून विद्यार्थ्यांसाठी लढा दिला. नगरसेवक म्हणून मनपात प्रवेश केल्यावर अभ्यासपूर्ण पद्धतीने तेथील भ्रष्टाचार चव्हाट्यावर मांडला. धर्मातील दांभिकतेवर बोलताना एका कथित साधूने हल्ला केल्यानंतरही उमेशबाबू डगमगले नाहीत. उलट त्यांनी अशा भोंदूबाबांचा खरा चेहरा समाजासमोर आणण्यासाठी श्याम मानवांच्या नेतृत्वात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची नवी आघाडी उघडली. उमेशबाबूंमुळेच नागपूरच्या शंभर शहिदांचे स्मारक झिरो माईलजवळ उभारल्या गेले. असे समाजाला विधायक दिशा देणारे उमेशबाबू हे खऱ्या अर्थाने अजातशत्रू होते.

अंधश्रद्धा निर्मूलनात पाखंडी बुवाबाजांची पोलखोल
अंधश्रद्धा विरोधात ढोंगी बुवाबाबा, मांत्रिक, तांत्रिक, ज्योतिष, भगत यांच्याकडून होणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या शोषणाविरुद्ध लहानपणापासून त्यांच्या मनात चीड निर्माण झाली होती. त्यांनी अनेकांचे पितळ उघडे करून भंडाफोड केला आहे. कृपालू महाराज, आसाराम बापू, शकुंतलादेवी, निर्मलबाबा, कलंकी भगवान, राधे माता, खटियावाले बाबा, गुलाबबाबा, चंगाई सभा (विदेशी पाद्री) कामठी येथील मस्जिदीत होणाऱ्या दैवी चमत्काराचे पितळ उघडे केले.

Web Title: non-stop social service; Umeshbabu Choubey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.