...तर घरी जावं लागेल; तुकाराम मुंढे 'इन अॅक्शन'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 09:20 PM2020-01-28T21:20:03+5:302020-01-29T08:53:16+5:30
आपली कर्तव्ये व जबाबदारी ओळखून कामे करावी. आपल्या कामाप्रती प्रामाणिक असणाऱ्यांना कुठल्याही स्वरुपाची भिती बाळगण्याचे कारण नाही. मात्र ज्यांना काम करावयाचे नाही त्यांनी घरी जावे, असा इशारा नागपूर महापालिकेचेआयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या काही दिवसापूर्वी बदल्या करण्यात आल्या. यात नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदीतुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली. चार दिवसानंतर मंगळवारी सकाळी ९.३० वाजता मुंढे यांनी पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर लगेच त्यांनी महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियमानुसार कामे करावीत. आपली कर्तव्ये व जबाबदारी ओळखून कामे करावी. आपल्या कामाप्रती प्रामाणिक असणाऱ्यांना कुठल्याही स्वरुपाची भिती बाळगण्याचे कारण नाही. मात्र ज्यांना काम करावयाचे नाही त्यांनी घरी जावे. असा इशारा मुंढे यांनी या बैठकीत दिला.
अभिजीत बांगर यांनी दोन दिवसापूर्वीच महापालिका आयुक्त पदाचा लिखीत पदभार सोडला होता. त्याआधारावर मुंढे यांनी पदभार स्विकारला. तत्पूर्वी आयुक्त सकाळी ९.३० पदभार स्विकारणार असल्याची माहिती विभाग प्रमुखांना मेसेज व्दारे देण्यात आली होती. मोबाईलवर हा मेसेज उशिरा बघितला त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. घाईघाईत त्यांना कार्यालयात पोहचावे लागले. तर काही अधिकारी उशिरा कार्यालयात पोहचले.
तुकाराम मुंढे हे शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्याची आयुक्तपदी बदली झाल्यापासूनच अधिकाऱ्यांपासून तर कर्मचारी वेळेत कार्यालयात येत असल्याचे बघायला मिळत आहे. मंगळवारी सकाळी मुंढे विमानाने मुंबईवरुन नागपूरला आलेत. विमानतळावरुन रवीभवनला आलेत. काही वेळ थांबल्यानंतर ९.३० वाजता महापालिकेत पोहचले. पहिल्याच दिवशी मुंढे यांनी कामाचा धडाका लावला. वरिष्ठ अधिकारी व विभाग प्रमुखांची बैठक घेतली. ५० मिनिटांच्या बैठकीत जलप्रदाय, मालमत्ता व आरोग्य (स्वच्छता) विभागाच्या कामाचा आढावा घेतला. बांधकाम विभागासाठी आर्थिक तरतुद किती ?, प्रस्ताव किती तयार केलेत अन् किती खर्च झाला. किती कामे पूर्ण झाली. सीमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे का रखडली.अशी विचारणा विभाग प्रमुखांना केली. झाडाझडतीमुळे अधिकाऱ्यांची चांगलीच घाबरगुंडी उडाली. त्यानंतर दुपारी पुन्हा आढावा बैठक घेतली.
आयुक्तांचा दररोज जनता दरबार
शहरातील नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी महापौर संदीप जोशी यांनी जनता दरबार सुरू केला आहे. तसेच महापालिका हद्दीतील नागरिकांच्या समस्या आणि तक्रारी आता थेट आयुक्तांसमोर मांडता येतील. यासाठी कुठल्याही पूर्वपरवानगीची गरज भासणार नाही. नागरिकांना कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दुपारी ४ ते सायंकाळी ५ या वेळेत आयुक्तांना भेटून आपले गाऱ्हाणे मांडता येईल. आयुक्तांचा जनता दरबार दररोज सुरू राहील. नागरिकांना समस्या वा तक्रारी मांडावयाच्या झाल्यास जनता दरबाराच्या नियोजित वेळेत यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
किती डिमांड वाटल्या?
महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता विभागाची जबाबदारी असलेल्या उपायुक्त राजेश मोहिते यांच्याकडून आयुक्तांनी मालमत्ता विभागाची माहिती जाणून घेतली. शहरात किती मालमत्ता आहेत. किती डिमांड वाटप करण्यात आल्यात. कर वसुली किती झाली. थकबाकी किती आहे. याची विचारणा केली. मात्र मोहिते यांच्याकडे माहिती उपलब्ध नसल्याने विभागाचे सादरीकरण करण्याचे निर्देश तुकाराम मुंढे यांनी दिले.
मुंढे कक्षात जाताच पाटी बदलली
तुकाराम मुंढे यांची चार दिवसापूर्वी आयुक्तपदी नियुक्ती झाली. परंतु ते कधी पदभार स्वीकारतील यांची आयुक्त कक्षाला पूर्वसूचना मिळाली नव्हती. यामुळे आयुक्तांच्या कक्षासमोर त्यांच्या नावाची पाटी लावलेली नव्हती. सकाळी ९.२५ पर्यंत आयुक्त अभिजित बांगर यांच्याच नावाची पाटी होती. मुंढे आयुक्त कक्षात जाताच कक्षापुढे त्यांच्या नावाची पाटी लावण्यात आली. यासाठी कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली.
कंत्राटदारांवर साफसफाईची जबाबदारी का नाही
शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी दोन कंत्राटदावर सोपविण्यात आली आहे. सोबतच शहरातील साफसफाईची जबाबदारी कंत्राटदारांवर का सोपविली नाही. शहरात दररोज किती कचरा निघतो. कचरा वाहून नेणारी वाहने किती आहे. किती कचऱ्यावर प्रक्रिया होते याची माहिती मुुंढे यांनी आरोग्य अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली.
आयुक्त कक्षात फक्त सात खुर्च्या
भेटीसाठी येणाऱ्या नागरिकांची तसेच पाहुण्याची गर्दी विचारात घेता आयुक्तांच्या कक्षात दोन डझन खुर्च्यां होत्या. परंतु मुंढे यांनी कक्षात फक्त सात खुर्च्या ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यातील सहा खुर्च्या आयुक्तांच्या खुर्ची समोर तर एक खुर्ची बाजूला ठेवण्यास सांगितले. त्यानुसार तातडीने रचना बदलण्यात आली.
असे आहेत मुंढे...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे नागपुरात रुजू होण्यापूर्वी राज्य एड्स नियंत्रण प्रकल्पाचे संचालक म्हणून कार्यरत होते. सन २००५ च्या तुकडीचे सनदी अधिकारी असलेले तुकाराम मुंढे यांनी यापूर्वी त्यांनी नवी मुंबई आणि नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कार्यभार सांभाळला आहे. आयुक्त म्हणून नागपूर ही तिसरी महानगरपालिका आहे. नागपुरात त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सन २००८ मध्ये कार्य केले आहे. पुण्यात पीएमपीएमएलचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. बीड जिल्ह्यातील ताडसोना गावात त्यांचा जन्म झाला असून प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले आहे. औरंगाबाद येथून त्यांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.