तालिबानचं नागपूर कनेक्शन? दोन महिन्यांपूर्वी वास्तव्यास असलेला 'तो' दहशतवादी बनल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 10:37 AM2021-08-20T10:37:14+5:302021-08-20T10:39:59+5:30
दोन महिन्यांपूर्वीपर्यंत नागपुरात अवैधपणे वास्तव्यास असलेला नूर दहशतवादी बनल्याचा संशय
नागपूर: अफगाणिस्तानवर कब्जा करत तालिबाननं २० वर्षांनंतर पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे. तालिबानी दहशतवाद्यांचे फोटो आणि व्हिडीओ समोर येत आहेत. त्यातला एक दहशतवादी दोन महिन्यांपूर्वी नागपूरमध्ये बेकायदेशीरपणे राहत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असल्याच्या आरोपाखाली दोन महिन्यांपूर्वी नूर मोहम्मद नावाच्या अफगाणी नागरिकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी त्यांना अफगाणिस्तानला पाठवून दिलं. तोच नूर मोहम्मद तालिबानीच्या एका तुकडीसोबत हातात बंदूक घेऊन उभा असल्याचे फोटो आता व्हायरल झाले आहेत.
व्हायरल झालेला फोटोबद्दल नागपूर पोलिसांना विचारणा केली असता, त्या फोटोत दिसणारी व्यक्ती नूर मोहम्मदच आहे की नाही, ते ठामपणे सांगता येणं शक्य नसल्याचं ते म्हणाले. पोलिसांनी नूर मोहम्मदला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं, तेव्हा त्याच्या मोबाईलमध्ये काही तालिबानी व्हिडीओ आढळले होते. तो काही तालिबानी नेत्यांचे ट्विटर हँडल फॉलो करत असल्याचंही पोलिसांना आढळून आलं होतं. याशिवाय नूरच्या शरीरावर बंदुकीच्या गोळीचे व्रणदेखील दिसून आले होते. नूर मोहम्मदनं नागपुरात कुठलंही बेकायदेशीर कृत्य केलं नसल्याचं लक्षात घेऊन पोलिसांनी त्याला हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला अफगाणिस्तानला परत पाठवण्यात आलं.
नूर मोहम्मद दहा वर्षांपूर्वी वैद्यकीय पर्यटन व्हिसावर भारतात आला होता. व्हिसाची मुदत संपल्यानंतरही तो मायदेशी परत गेला नव्हता. नूर बेकायदेशीररित्या सुमारे दहा वर्ष नागपुरात वास्तव्यास होता. या कालावधीत त्यानं नेमका काय केलं? कोणावर नजर ठेवली का? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.