ना मराठवाड्याला, ना विदर्भाला !
By admin | Published: September 24, 2016 01:11 AM2016-09-24T01:11:17+5:302016-09-24T01:11:17+5:30
मराठवाड्यात दुष्काळामुळे चारा आणि पाण्याचे संकट उभे ठाकले होते. त्यामुळे महसूल विभागाने वनविभागाला पत्र पाठविले आणि चारा विक्री थांबविण्यास लावली.
अखेर चारा सडला : महसूल आणि वन विभागाच्या गलथान कारभाराचा शेतकरी बळी
नागपूर : मराठवाड्यात दुष्काळामुळे चारा आणि पाण्याचे संकट उभे ठाकले होते. त्यामुळे महसूल विभागाने वनविभागाला पत्र पाठविले आणि चारा विक्री थांबविण्यास लावली. त्यापूर्वी एका शेतकऱ्याने वनविभागाकडे रोख रक्कम भरून चारा खरेदीचे कंत्राट घेतले होते. त्याने सहा टन चारा कापूनही ठेवला होता. परंतु विक्री थांबविण्यात आल्यामुळे वनविभागाने त्याला चारा नेऊ दिला नाही. त्याने जिल्हाधिकाऱ्यापासून वनविभागापर्यंत चारा घेऊन जाण्यासाठी पाठपुरावा केला. परंतु शासनाचे आदेश दाखवून त्याची अडवणूक केली. शेवटी पावसाळा लागला, हा चारा ना मराठवाड्याच्या दुष्काळी भागात गेला, ना विदर्भातील जनावरांना मिळाला. चारा जागच्या जागी पडून सडून गेला.
वनविभागाच्या चांदणी तृण संशोधन केंद्राने ५ आॅगस्ट २०१५ रोजी चारा लिलाव केला.
वर्धा जिल्ह्यातील गुंडमुंड गावातील नंदू गावंडे या शेतकऱ्याने ७७४९० रुपये वनविभागाकडे जमा करून चाऱ्याची खरेदी केली. २ सप्टेंबर २०१५ ला त्याला चारा कापण्याचा परवाना मिळाला. वनविभागाच्या २५० एकरातून त्याने मजूर लावून सहा टन चाऱ्याची कटाई केली. त्यातील ५० टक्के चारा नंदूने आपल्या जनावरांच्या उपयोगी आणला. परंतु उर्वरित ५० टक्के चारा असताना, त्याच काळात मराठवाड्यात दुष्काळाचे सावट उभे ठाकले. शासनाच्या महसूल विभागाने वनविभागाला पत्र लिहून चारा खरेदी थांबविण्यास सांगितले. त्यामुळे नंदूने कापून ठेवलेला ५० टक्के चारा घेऊन जाण्यास वनविभागाने इंकार केला. नंदूने जिल्हाधिकारी व वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे चारा मिळावा यासाठी बराच पाठपुरावा केला. परंतु महसूल विभागाचे आदेश दाखवून त्याची अडवणूक करण्यात आली. त्याने लिलावाचे अर्धे पैसे व कटाईसाठी खर्च झालेल्या मजुरीचे पैसे देण्याची मागणी केली. परंतु त्याच्या मागणीकडे दोन्ही विभागाने दुर्लक्ष केले.
जून महिन्यापर्यंत कुठलेही उत्तर दोन्ही विभागाकडून आले नाही. त्यानंतर पावसाळा सुरू झाला. परंतु कापून ठेवलेला चारा दोन्ही विभागाने मराठवाड्यात पाठविला नाही. शेवटी १६ आॅगस्ट २०१६ ला नंदूला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पत्र आले.
त्याने कापलेला चारा घेऊन जाण्यास परवानगी दिली. तोपर्यंत चारा पावसामुळे सडून गेलेला होता. तो जनावरांच्या खाण्याच्या कामी नसल्याने नंदू दु:खी झाला. आता त्याने वनविभागाकडे नुकसानभरपाई मागितली आहे. यावर्षीचा लिलाव रद्द करावा, अशी मागणी नंदू गावंडे यांनी पत्रपरिषदेत केली. (प्रतिनिधी)