उत्तर नागपुरात गँगवार

By admin | Published: April 1, 2015 02:22 AM2015-04-01T02:22:56+5:302015-04-01T02:22:56+5:30

पाटणकर चौकात मंगळवारी भरदिवसा झालेल्या गोळीबाराने अख्खे उत्तर नागपूर थरारले.

North Gangpur in Nagpur | उत्तर नागपुरात गँगवार

उत्तर नागपुरात गँगवार

Next

नागपूर : पाटणकर चौकात मंगळवारी भरदिवसा झालेल्या गोळीबाराने अख्खे उत्तर नागपूर थरारले. वर्चस्वाच्या लढाईतून लिटील सरदार गँगने गोल्डी सरदार गँगवर अगदी सिनेमा स्टाईल फायरिंग केली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
घटनेची माहिती पोलिसांना मिळताच जरीपटका पोलिसांसह गुन्हे शाखेचे पोलीस व सहपोलीस आयुक्त अनुपकुमारसिंग घटनास्थळी पोहचले. परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला होता. यासंदर्भात जरीपटका पोलीस ठाण्यात गोल्डी भुल्लर याने आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलीस सूत्रानुसार गोल्डी भुल्लर व त्याचे सहकारी युवराज हरदीप सिंह, पिंटू भुल्लर, नवज्योत अटवाल, जोरी ऊर्फ झुल्लर सिंह ढिल्लो मंगळवारी दुपारी जसवंत आयनॉक्समध्ये सिनेमा बघण्यासाठी गेले होते. गोल्डी गाडी पार्क करून मोबाईलशी खेळत होता तर इतर सहकारी तिकीट काढण्यासाठी गेले होते. याच दरम्यान लिटील सरदार चा साळा मोनू सिंह थिएटरच्या पायऱ्या चढत होता. दरम्यान गोल्डीच्या सहकाऱ्यांचा मोनूला धक्का लागला. त्यातून मोनू व गोल्डीच्या सहकाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली. बाचाबाचीतून हाणामारी सुरू झाली. त्यानंतर मोनूने आपला जावई लिटील सरदार याला फोन करून बोलावून घेतले. तेव्हा लिटील सरदार काही क्षणातच कारने तिथे पोहचला. दुसऱ्या कारमध्ये बॉडीगार्ड ऊर्फ सत्तू सरदार, बिट्टू भाटिया, राजू टांक व अन्य सहकारी तेथे आले. यासर्वांनी शस्त्र घेऊन गोल्डी गँगवर हल्ला केला. तोच गोल्डी गँगने आपल्या सहकाऱ्यांना घेऊन पळ काढला. लिटील सरदारनेही त्यांचा कारने पाठलाग केला. दरम्यान लिटील सरदारच्या गँगने धावत्या कारमधून गोल्डीच्या गाडीवर अंदाधुंद गोळीबार केला. सुदैवाने गोळी कुणाला लागली नाही. मात्र गोळीचा आवाज ऐकून एमटी विभागातील पोलीस धावत बाहेर पडले. पोलिसांना बघून लिटीलच्या टोळीने तेथून पळ काढला. याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, घटनास्थळावरून चार रिकामे काडतुस जप्त केले आहे. पोलीस रात्री उशिरापर्यंत लिटीलच्या गँगचा शोध घेत होते. (प्रतिनिधी)

Web Title: North Gangpur in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.